Pune Crime| बदलीसाठी कर्ज घेतलेल्या सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या
By विवेक भुसे | Published: September 20, 2022 04:10 PM2022-09-20T16:10:45+5:302022-09-20T16:11:54+5:30
ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली...
पुणे : पुण्याला बदली हवी होती, त्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, ते पैसे देण्यासाठी सावकारांकडून भरमसाट व्याजदराने ८४ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर पैशांसाठी सावकरांनी तगादा लावला होता. या पैशांची परतफेड करण्यासाठी त्यांनी ७ व्या सावकाराकडून १ कोटीचे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने पैसे घेऊनही कर्ज देण्यास नकार दिल्याने त्याचा त्यांना धक्का बसला. त्यातून सहकार विभागाच्या लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
गणेश शंकर शिंदे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी शोभना गणेश शिंदे (वय ४७) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय प्रविणभाई राणतारा (वय ३६, रा. मंगळवार पेठ), बाळकृष्ण रामचंद्र क्षीरसागर (वय ५६, रा. मंगळवार पेठ), गणेश भगवान साळुंखे (वय ५०, रा. दांडेकर पुल), मनीष पाचुगोपाल हजरा (वय ४६, रा. दातार अपार्टमेंट, रविवार पेठ) यांना अटक केली आहे. शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय याचे वडिल, पंधरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात विशेष लेखा परिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी व दोन मुली,आई पुण्यात रहात होते. शिंदे यांनी मुंबईहून पुण्याला बदली हवी होती. बदलीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी शिंदे यानी वेगवेगळ्या सावकारांकडून १० ते १५ टक्के व्याजाने ८४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी २० ते ३० टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. या पैशासाठी आरोपींनी शिंदे यांचा मानसिक व आर्थिक छळ सुरू केला होता.
पंधरकर नावाच्या व्यक्तीने शिंदे यांना १ कोटी रुपयांचे पीएल लॉन करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता शिंदे यांची मोठी आर्थिक रक्कम उकळण्यात आली. ऐनवेळी लोन करून देण्यास नकार दिल्याने शिंदे यांना धक्का बसला होता. गणेश शिंदे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असल्याने गेल्या ३ महिन्यांपासून ते घरीच होते. बदलीसाठी वरिष्ठांना पैसे दिले. परंतु सरकार बदलल्याने त्यांची बदली होऊ शकली नाही. दुसरीकडे सावकारांनी पैशांचा तगादा लावला होता. त्यांची पत्नी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेल्या असताना गणेश शिंदे यांनी बेडरुममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी १२ पानी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी खासगी सावकार, मित्र, नातेवाईक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर्जावर पैसे घेतले होते, त्याची माहिती देण्यात आली आहे.
गणेश शिंदे यांनी घेतलेले कर्ज व मासिक व्याजाचा दर
शंकर गायकवाड - अंदाजे ६ ते ७ लाख - १० ते १८ टक्के व्याज
विजय सोनी (राणतारा) - ५ लाख - १० टक्के व्याज
विजय सोनीचे वडील - अंदाजे १९ लाख - १० टक्के व्याज
बाळकृष्ण क्षीरसागर - अंदाजे ४० लाख - १०, १२, १४ टक्के व्याज
गणेश साळुंखे - अंदाजे ९ लाख - १० टक्के व्याज
मनीष हाजरा - अंदाजे ४लाख ५० हजार - १० ते १५ टक्के व्याज