Pune: अकाउंटंट महिलेला घातला साडेनऊ लाखांना गंडा, संचालक असल्याचे भासवून फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: December 15, 2023 05:05 PM2023-12-15T17:05:41+5:302023-12-15T17:18:31+5:30
अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या २ आरोपींवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : शहरातील एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाउंट विभागात काम करणाऱ्या महिलेला संचालक बोलत असल्याचे भासवून ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यास भाग पाडले. यात कंपनीच्या अकाऊंटमधून वेगवेगळ्या ट्रान्झेक्शनद्वारे एकूण ९ लाख ६० हजार रुपये पाठविले गेले. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या २ आरोपींवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून बाणेरस्थित एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या महिलेला व्हाॅट्सॲप कॉल केला. "मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. कृपया व्हाॅट्सॲप मेसेज तपासा आणि सांगितल्याप्रमाणे करा, "असे सांगून फोन कट केला.
महिलेने व्हाॅट्सॲप पाहिले असता खालील बँक खात्यावर सांगितल्याप्रमाणे रक्कम ट्रान्स्फर करा, असे मेसेजमध्ये म्हटले होते. त्यानुसार फिर्यादी महिलेने एकूण ९ लाख ६० हजार रुपये ट्रान्स्फर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर हे करत आहेत.