अकरा आरोग्य केंद्रे ‘कायाकल्प’चे मानकरी

By admin | Published: December 28, 2016 04:28 AM2016-12-28T04:28:04+5:302016-12-28T04:28:04+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेने आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे राज्यस्तरीय ‘कायाकल्प’ची बक्षीसपात्र ठरली आहेत. यात मोरगाव प्राथमिक

Accreditation of eleven health centers 'rejuvenation' | अकरा आरोग्य केंद्रे ‘कायाकल्प’चे मानकरी

अकरा आरोग्य केंद्रे ‘कायाकल्प’चे मानकरी

Next

- बापू बैलकर, पुणे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेने आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे राज्यस्तरीय ‘कायाकल्प’ची बक्षीसपात्र ठरली आहेत. यात मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेने कात टाकली असून, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतून दर्जेदार आरोग्यसेवा देण्यात येत आहे. ‘कायापालट’ हा उपक्रम हाती घेऊन आरोग्य विभागाने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आरोग्यसेवा व चांगल्या भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून नुकत्याच जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे एनएबीएच या राष्ट्रीय नामांकनासाठी पात्र ठरली आहेत. शासनातर्फे गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेने एकूण ७०३ व सरासरी ७८ टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणखी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना एनएबीएचसाठी तयारी सुरू असून, ती पुढील वर्षात पात्र ठरतील, असा विश्वास आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
शासनाने मे २0१५ मध्ये एक कार्यशाळा घेण्यात येऊन त्यामध्ये राज्यस्तरावर कायाकल्प योजना राबविण्याचे ठरविण्यात आले होते. सुरुवातीला ही योजना फक्त जिल्हा रुग्णालयांसाठी होती. मात्र स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २0१६-१६ मध्ये ही योजना प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही लागू करण्यात आली.
जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैैकी ७0 प्राथमिक आरोग्य केंदे्र पहिल्या टप्प्यातील परीक्षणासाठी पात्र ठरली.
दुसऱ्या फेरीसाठी यापैकी ४0 केंद्रे पात्र ठरली, तर तिसऱ्या फेरीत २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जिल्हास्तरावर जिल्हा परीक्षण समितीमार्फत करण्यात आले. त्यानुसार ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे कायाकल्पसाठी राज्यस्तरावर बक्षीसपात्र ठरल्याचे घोषित करण्यात आले आहे. या ११ केंद्रांची आता देशपातळीवरील नॅशनल क्वालिटी एश्युरन्स स्टॅन्डर्डसाठी (एनक्यूएस) निवड झाली आहे.
यात प्रथम क्रमांक बारामतीतील मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकावला असून, त्याला २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर खामगाव, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सावरगाव, टाकवे, खडकाळा, टाकळी हाजी, करंजविहिरे, शेळपिंपळगाव व माण या केंद्रांची निवड झाली असून, त्यांना
५0 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

अशी झाली निवड : कायाकल्पसाठी एक चेकलिस्ट तयार करण्यात आली असून, केंद्राचा टापटीपपणा, स्वच्छता, जंतुसंसर्ग व जेववैविध्याची विल्हेवाट, इतर सुुविधा आणि दिले जाणारे आरोग्य शिक्षण या विविध पातळीवर स्वत: तपासणी, इतर तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून तपासणी व शेवटी जिल्हास्तरीय कमिटीकडून तपासणी केली जाते. यात प्रत्येक स्तरावर ७0 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या केंद्राची निवड केली जाते.

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देऊन दुर्गम भागातील ग्रामस्थांचे आरोग्यमान वाढविणे ही आमची प्रायॉरिटी राहिली आहे. आमची सर्वच ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच दर्जेदार सेवा मिळावी, हा आमचा उद्देश आहे.
- प्रदीप कंद,
अध्यक्ष, जिल्हा परिषद

कायाकल्पमध्ये ११ प्राथमिक केंद्रांची निवड झाली आहे, हे अभिमानास्पद आहेच. शिवाय २५ केंद्रांना राष्ट्रीय मानांकनाचा दर्जा मिळाला असून पुढील काळात आणखी २५ केंद्रे यासाठी सज्ज होत आहेत. ती केंद्रेही या दर्जास उतरतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. भगवान पवार,
आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Accreditation of eleven health centers 'rejuvenation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.