दाभोलकर हत्येतील आरोपींवर १५ सप्टेंबरला होणार दोषारोप निश्चिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:13 AM2021-09-08T08:13:10+5:302021-09-08T08:14:00+5:30
शेवटची मुदतवाढ : वकील, नातेवाईकांना भेटण्याची आरोपींची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चिती १५ सप्टेंबरला होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर मंगळवारी (दि.७) दोषारोप निश्चिती करण्यात येणार होती. त्यासाठी अंदुरे, डॉ. तावडे, ॲड. पुनाळेकर हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सद्वारे उपस्थित होते. भावे स्वत: हजर होता. तर कळसकर तांत्रिक अडचणींमुळे हजर राहू शकला नाही. न्यायालयाने आरोपींना गुन्हा मान्य आहे का, अशी विचारणा केली. मात्र, कोरोनामुळे नातेवाईक व वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळावी, अशी विनंती सचिन अंदुरे व डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी केली. पाच आरोपींपैकी एक आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने दोन आरोपींनी केलेली मुदतवाढीची विनंती न्यायालयाने मान्य केली. मात्र, यानंतर आणखी मुदतवाढ देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खटला लवकर चालवावा लागेल, असे सांगत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनीच आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांना कोणती तारीख देऊ, अशी विचारणा केली. सीबीआयच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी कामकाज पाहत आहेत.