दाभोलकर हत्येतील आरोपींवर १५ सप्टेंबरला दोषारोप निश्चिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:44+5:302021-09-08T04:14:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हा मान्य आहे का अशी विचारणा न्यायालयाने आरोपींना केली. मात्र कोरोनामुळे नातेवाईक आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हा मान्य आहे का अशी विचारणा न्यायालयाने आरोपींना केली. मात्र कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळण्याची विनंती सचिन अंदुरे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी केली. पाच आरोपींपैकी एक आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने दोन आरोपींनी केलेली मुदतवाढीची विनंती मान्य करीत न्यायालयाने १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित केला जाईल, असे सांगितले. मात्र, आरोपींना आणखी मुदतवाढ देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर मंगळवारी (दि.७) दोषारोप निश्चिती करण्यात येणार होते. त्यासाठी अंदुरे, डॉ. तावडे, ॲॅड. पुनाळेकर हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सद्वारे उपस्थित होते. भावे स्वत: हजर होता. तर कळसकर तांत्रिक अडचणींमुळे हजर राहू शकला नाही.
न्यायालय वारंवार आरोपीना गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा करीत होते. आजच गुन्हा निश्चिती व्हायला हवी असे न्यायालय वारंवार सांगत होते. परंतु, कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळण्याची विनंती अंदुरे आणि डॉ. तावडे यांनी केली. आरोपींना त्यांच्या नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधण्याचे नियोजन करून देण्यात येईल. याप्रकारची न्यायालय ऑर्डरही काढेल. मात्र एक आठवड्यानंतर पुन्हा तारीख दिली जाणार नाही. खटला लवकर चालवावा लागेल असे सांगत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनीच आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांना कोणती तारीख देऊ, अशी विचारणा केली. त्यावर १५ सप्टेंबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी कामकाज पाहत आहेत.
या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर ॲॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून ॲॅड. पुनाळेकर आणि भावे जामिनावर आहेत.