कात्रज भागात गोळीबार करणारे आरोपी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 06:50 PM2020-12-16T18:50:47+5:302020-12-16T18:51:43+5:30
सातारा भागात सापळा रचून पकडले आरोपी
कात्रज: कात्रज भागातील शनीनगर भागात मागील भांडणाचा राग मनात धरून गोळीबार करत कोयत्याने मारहाण करणारे कुख्यात गुंड गणेश पवार यांच्या टोळीतील दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१० डिसेंबर रोजी कात्रज भागातील कुख्यात गुन्हेगार गणेश पवारच्या टोळीतील साथीदाराने मागील भांडणाचा राग मनात धरून सिद्धिक शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता . तसेच कोयत्याने,हाताने व दगडाने मारहाण करत भागामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितिन शिंदे व त्यांच्या टीमने या गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.पोलीस पथकातील सर्फराज देशमुख व सचिन पवार यांना खबऱ्यामार्फत या टोळीतील आरोपी सोन्या कांबळे व विशाल सोमवंशी हे सातारा भागातील सुरुस फाटा येथे असल्याची माहिती मिळाली.भारती विद्यापीठ पोलिसांनी वेळ न दवडता पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे,संतोष भापकर,सोमनाथ सुतार,रविद्र भोसले,अभिजित जाधव,गणेश शेंडे,राहुल तांबे,विक्रम सावंत यांच्या पथकाला आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले.
आरोपीकडे हत्यार असणार याची माहिती पोलिसांना होती,तरीही मोठ्या शिताफीने स्वताच्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून आरोपींना अटक केली.यावेळी आरोपींनी पळुन जाण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यांना यात यश आले नाही.आरोपीकडे पोलिसांना एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळाले आहे.यातील आरोपी सोन्या कांबळे याने आपण गणेश पवार याच्या सांगण्यावरून फायरींग केली असल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.