अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:56 PM2018-08-31T23:56:44+5:302018-08-31T23:57:16+5:30
पीडित मुुलीचे शहर पोलीस ठाण्याच्या दारात उपोषण
बारामती : दहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल होऊनदेखील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. त्यामुळे पीडित मुलीने चक्क बारामती शहर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण आरंभले आहे. २१ आॅगस्ट रोजी आरोपी कृष्णा महादेव जाधव याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल असतानादेखील आरोपी शहरात मोकाट फिरत आहे. अद्याप अटक न झाल्याने उजळ माथ्याने तो वावरत आहे. त्यामुळे पीडितेच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.
आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल असूनेखील त्याला अटक का होत नाही, याचे गुढ समजत नाही. मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना अर्ज निवेदन पाठविले होते. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. परंतु आरोपी मोकाट फिरत आहे. हक्कासाठी, न्यायासाठी माझे उपोषण सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पीडित अल्पवयीन मुलीने केली आहे.
काही दिवसांपूर्वीच बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील अल्पवयीन मुलीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी निर्भया पथक, पोलीस पथकामार्फत कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी मात्र उजळ माथ्याने मोकाट फिरत आहे. त्याला अटक करण्यासाठी अल्पवयीन पीडितेवर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोडरोमिओंवर कारवाई करणारे पोलीस अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक केव्हा करणार, हा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.