लोणावळ्यात दरोडा टाकल्याप्रकरणी आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:58+5:302021-07-30T04:10:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोणावळा येथील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपींना ग्रामीण पोलिसांनी तब्बल २४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणावळा येथील डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपींना ग्रामीण पोलिसांनी तब्बल २४ दिवस मध्य प्रदेशात तळ ठोकून जेरबंद केले आहे. यातील सर्व १५ आरोपींना पोलिसांनी पकडले असून, त्यांच्याकडून २३ लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ६ लाख २६ हजार रुपयांची रोकड, ५७ हजार ५०० रुपयांचे मोबाईल असा ३० लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
लोणावळा येथील डॉ. हिरालाल खंडेलवाल (वय ७३) यांचे खाली हॉस्पिटल असून, वरच्या मजल्यावर ते राहतात. १७ जून २१ रोजी पहाटे एकच्या दरम्यान खिडकीवाटे आत शिरून चोरट्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून घरातील ५० लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने असा ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने खाली हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफला वरच्या मजल्यावरील घटनेची काहीही खबर मिळाली नाही. डॉक्टरांनी आपले हातपाय सोडवून घेऊन बेल वाजवून इतरांना याची माहिती दिली.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना ग्रामीण पोलिसांना लोणावळा रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून काही जणांची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी काही आरोपींना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून मध्य प्रदेशातील हेमंत कुसवाह व त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल २४ दिवस मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात तळ ठोकून यातील प्रमुख सूत्रधारासह चौघांना अटक केली.
हेमंत कुसवाह (वय २४), प्रशांत कुसवाह (वय २७), दौलत पटेल (वय २४), गोविंद कुशवाह (१८), प्रदीप धानुक (वय २८, सर्व रा. रहातगड, जि. सागर), नथू विश्वासराव, सुनील शेजवळ , रवींद्र पवार, शामसुंदर शर्मा, मुकेश राठोड, सागर धोत्रे, दिनेश अहिरे, विकास गुरव, संजय शेंडगे अशी आरोपींची नावे आहेत.