खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:39 PM2018-08-13T15:39:20+5:302018-08-13T15:42:35+5:30
तुम्ही लोण्यात बनावट तेल भेसळ करता, हे मोठ्या साहेबांना सांगतो, असे सांगून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़.
पुणे : खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या ७ महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला दरोडा प्रतिबंधक विभागाने पकडले आहे़. अमित कांता चोरगे असे त्याचे नाव आहे़. अमित चोरगे याने कोंढव्यातील एका व्यापाऱ्याला तुम्ही तुपात भेसळ करता, मला ५० हजार रुपये खंडणी द्या नाहीतर तुमची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करेन, अशी धमकी दिली होती़. याप्रकरणी सुनिल तिवारी (रा़ कोंढवा) कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली होती़.
तिवारी यांचा लोणी बनविण्याचा कारखाना आहे़. १६ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ते घरात असताना चार अनोळखी कारखान्यात आले़. त्यांनी त्यांचा नोकर रमेशचंद्र गुप्ता याला तुझा मालक कुठे आहे असे विचारले़. त्यांच्यातील एकाने तिवारी यांना घरातून बोलवून कारखान्यावर नेले़ व शटर बंद करुन घेतले़. त्यांना तुम्ही लोण्यात बनावट तेल भेसळ करता, हे मोठ्या साहेबांना सांगतो,असे सांगून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़. त्यांनी त्यास नकार दिल्यावर त्यांना गाडीत बसून कात्रज, धनकवडीत भागात फिरविले़. आपली सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी ३५ हजार रुपये त्यांना दिले होते़. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता़. त्यात कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौघांना अटक केली होती़. चोरगे तेव्हापासून फरार होता़.
तो महमंदवाडी येथील रेल्वे गेटजवळील मॅजेस्टीक सोसायटीजवळ येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाला मिळाली़. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले़. त्याच्यावर यापूर्वी खुन, खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत़.