बंगाली युवतीवर सतत दहा वर्षांपासून बलात्कार करणारा आरोपी बारामतीहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:12 PM2018-05-16T22:12:54+5:302018-05-16T22:12:54+5:30
लग्नाचे आमिष दाखवून बंगाली युवतीवर सतत दहा वर्षांपासून बलात्कार करून फरार आरोपीला बारामतीहून अटक, अठरा मे पर्यंत पोलीस कोठडी
चाकण : लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा वर्षांपासून बंगाली युवती सोबत एकाच खोलीत एकत्र राहून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक करून शिवीगाळ व दमदाटी करून पीडित महिलेस एकटी सोडून फरार झालेल्या आरोपीला चाकण पोलिसांनी बारामतीहून अटक केली असून न्यायालयाने आरोपीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात अली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवार दि. १ मार्च २०१८ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली. सन २००७ ते दि. ४ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपी अमोल सिद्दप्पा परिट ( वय ३२, रा. महाळुंगे इंगळे, मूळ रा. निंबर्गी, ता.दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ) हा १ मार्चला गुन्हा दाखल झाल्यापासून मुळगावाहूनही फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस नाईक वीरसेन गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बारामतीहून ताब्यात घेतले व अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, सन २००६ मध्ये आरोपी अमोल परीट व फिर्यादी महिलेची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सन २००७ मध्ये आरोपीने पीडित युवतीस ‘आपण दोघे लग्न करून चाकण येथे कंपनीत काम करून एकत्र राहू’ असे म्हणून लग्न करण्याचे अमिष दाखवून महाळुंगे येथे खोली भाड्याने घेऊन एकत्र राहू लागले. सदर कालावधीत आरोपीने पीडित युवतीवर शरीर संबंध ठेवले व पीडितेस लग्न करतो, असे सांगून युवतीची फसवणूक केली. दहा वर्षे एकत्र राहूनही पीडितेने त्यास लग्नाबाबत विचारल्यावर आरोपीने पीडितेस वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. व दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी पीडितेस सोडून त्याचे मूळगावी निघून गेला. पीडितेने वेळोवेळी फोन केले असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०१८ भादंवि कलम ३७६, ४१६, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप हे पुढील तपास करीत आहेत.