दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 01:07 PM2019-06-04T13:07:32+5:302019-06-04T13:10:11+5:30
दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर यान दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती.
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीची मुदत आज (४जून) संपत असल्याने आरोपींना शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासाची नेमकी दिशा काय असेल यासाठी न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.आरोपींच्या चौकशीतून मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. कळसकर याच्याच जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला होता.
संजीव पुनाळेकर यांनी आरोपीना गुन्ह्यात वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला. हे वकिली नियमांचे उल्लंघन आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्या डेटाचे विश्लेषण करण्याचे काम अद्याप सुरू आहे. तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असल्याने विक्रम भावे याच्याकडे सखोल चौकशी करायची आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात अनेक आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्यासाठी दोघांनाही अतिरिक्त 14 दिवस सीबीआय कोठडी द्यावी. असा युक्तिवाद सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी केला.
या गुन्ह्यातील आरोपी शरद कळसकर याने दुस?्या गुन्ह्यात दिलेल्या कबुलीजबाबावरुन पुनाळेकर आणि भावे याना अटक करण्यात आली आहे. कळसकर याच्या जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. आपल्या अशीलाला सल्ला देणे हा गुन्हा नाही. असे झाले तर वकिलांना आपले काम करणे अवघड होईल. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ देत केलेली अटक कशी चुकीची आहे हे न्यायालयास सांगण्यात आले. तसेच अटक करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे देखील सीबीआयकडे नाहीत. दोघांवरही दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अॅड सुभाष झा आणि अॅड गणेश उपाध्याय यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडताना सूर्यवंशी म्हणाले, योग्य चौकशी केल्यानंतरच दोघाना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्यास सांगणे हा कायदेशीर सल्ला नाही. तसेच आरोपीच्या अटकेला आव्हान करायचे असेल त्यावर सर्वोच्च न्यायालयात जावे.