अत्याचार करणारा नराधम निघाला बड्या नेत्याचा कार्यकर्ता; माजी आमदारांच्या फ्लेक्सवरील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:52 IST2025-02-27T10:43:40+5:302025-02-27T10:52:38+5:30
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात एका नराधमाने तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

अत्याचार करणारा नराधम निघाला बड्या नेत्याचा कार्यकर्ता; माजी आमदारांच्या फ्लेक्सवरील फोटो व्हायरल
पुण्यातील स्वारगेट बसस्थाकामध्ये काल बुधवारी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टमध्ये तरुणीवर दोनवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत. तर दुसरीकडे आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी एका बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे.
मोठी बातमी..! स्वारगेट प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेसाठी पोलिसांचे १ लाखांचे बक्षीस
आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो एका नेत्याच्या फ्लेक्सवरती आहे. हा फ्लेक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फ्लेक्सवर आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो दिसत आहे. आरोपी गाडे हा शिरुर परिसरातील आहे. तो बॅनर शिरुर येथे लावण्यात आला असून बड्या नेत्यांच्या फ्लेक्सवर आरोपी गाडेचा फोटो आहे.
आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल होते. यापूर्वीही आणखी कोणत्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आरोपी गाडे याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असून त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी घडला. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) याने पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर पसार झाला.
या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणेपोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
आरोपीस पकडणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस
पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.