आरोपी डॉ. अजय तावरेच्या नियुक्तीसाठी आमदार टिंगरेंची शिफारस अन् मंत्री मुश्रीफांचा 'शिक्का'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:57 PM2024-05-27T17:57:17+5:302024-05-27T18:06:24+5:30
कारचालक 'बाळा'चा रक्त तपासणी अहवाल बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते...
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली होती. कारचालक 'बाळा'चा रक्त तपासणी अहवाल बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि सीएमओ (कॅज्युअलटी विभाग) डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा अटक केली होती. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात खळबळ माजली होती.
या प्रकरणात आणखी एक बाब समोर आली आहे. आरोपी तावरेची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्याची शिफारस पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यानंतर तावरेची ससूनच्या अधिक्षकपती नियुक्ती करण्यात आली होती. त्या शिफारसीचे पत्र माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
आमदार सुनिल टिंगरे यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मा. महोदय, उपरोक्त विषयान्वये माझ्या परिचयाचे डॉ. अजय अ. तावरे हे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक या पदावर, ससून सर्वोपचार रुग्णालयात कोविड १९ च्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडलेले आहे. तरी डॉ. अजय अ. तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा अतिरीक्त कार्यभार देणेबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही व्हावी हि विनंती". अशी विनंती आमदार टिंगरेंनी मंत्री मुश्रीफांकडे केली होती. त्यानंतर मंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तावरेची नियुक्ती ससुनच्या अधिक्षकपदी केली होती.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातही ‘ससून’चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर याचे नाव समोर आले होते, अन्य एका डॉक्टरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक केली आहे. पैशांच्या लालसेतून डॉक्टर मंडळीच असे कृत्य करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिस आयुक्तांचा संशय ठरला खरा :
अपघाताच्या घटनेनंतर नियमानुसार 'बाळा'चे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. मात्र, हाय प्रोफाइल केस असल्याने या प्रकरणात कोणतीही शंका मनात राहू नये यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सांगण्यावरून 'बाळा'चे दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेण्यात आले. मात्र, हे ब्लड सॅम्पल ससूनमध्ये न पाठवता खासगी लॅबला तपासणीसाठी विशेषत: डीएनए रिपोर्टसाठी पाठवले होते. रविवारी (दि. २६) पोलिसांकडे दोन्ही ब्लड रिपोर्ट आले. यामध्ये ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाख रुपयांच्या बदल्यात त्यात फेरफार केल्याचे स्पष्ट झाले.
पुणे पोर्शे अपघात प्रकरण: आरोपी डॉ. अजय तावरेच्या नियुक्तीसाठी आमदार टिंगरेंची शिफारस अन् मंत्री मुश्रीफांचा 'शिक्का'#puneaccident#suniltingarepic.twitter.com/3ZdihklxXY
— Lokmat (@lokmat) May 27, 2024
पोलिस आयुक्त म्हणाले...
- ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी रक्ताचे नमुने बदलले. 'बाळा'चे घेतलेले रक्त कचऱ्यात टाकून दुसऱ्या रक्ताचे नमुने तपासासाठी पाठवले.
- आम्ही संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि रक्त तपासणी अहवालातील फेरफार लक्षात आला. त्यानंतर गुन्हे शाखेने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
- डॉ. तावरे हा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख आहे, तर डॉ. हाळनोर सीएमओ (कॅज्युअलटी विभाग) विभागात नेमणुकीस आहे.
- पोलिस ब्लड रिपोर्टची वाट पाहत होते. या रिपोर्टमध्ये फेरफार होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी मुलाचे रक्ताचे दोन नमुने घेतले होते.