ससूनमधून पळालेला आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:52 AM2018-05-22T06:52:14+5:302018-05-22T06:52:14+5:30
उरुळी कांचन येथून घेतले ताब्यात : २४ तासांत जाळ्यात
पुणे : पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे़ या पथकाने त्याचा माग काढत २४ तासांच्या आत उरुळी कांचन येथून ताब्यात घेतले़
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त समीर शेख यांनी माहिती दिली़ अक्षय अशोक लोणारे (वय २१, रा. कोंढवा बुद्रुक) असे आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी त्याला बलात्कार आणि पॉस्को अॅक्टअंतर्गत गुन्ह्यात २०१५ मध्ये
अटक केली होती. लोणारे हा न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात होता़ मानसिक आजार असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र रविवार, दि. २० मे रोजी तेथे नेमणुकीस असलेल्या चौघा कर्मचाºयांची नजर चुकवून पळून गेला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीवरून जाताना पाठलाग
बंडगार्डन पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. आरोपी लोणारे याने ससूनमधून पळ काढल्यानंतर रिक्षाने कोंढवा येथे गेला; तसेच तेथे त्याने दोघा मित्रांकडून पैसे घेतले. तेथून हडपसरमार्गे एसटी बसमधून उरुळी कांचन येथे गेला़ लोणारे हा उरुळीकांचन येथे गेल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ पथकातील पोलीस हवालदार अनिल घाडगे यांना बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, शकुर सय्यद, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, शिवानंद स्वामी, गजानन गानबोटे, गुणशिलन रंगम, महेंद्र पवार, अनिल भोसले, संदीप राठोड, अजिनाथ काळे, कल्याणी आगलावे या पथकाने सापळा लावला.
लोणारे हा दुचाकीवरून जाताना दिसताच पथकाने त्याचा पाठलाग करून रात्री पकडले़