अंदमान कोर्टाने वॉरंट बजावल्यानंतर आरोपीचे पलायन; येरवडा परिसरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 10:56 AM2021-01-28T10:56:07+5:302021-01-28T10:56:34+5:30
आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पलायन केले.
पुणे : साऊथ अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांचे वाॅरंट बजावून पोलीस ठाण्याच्या आवारात आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पलायन केले.
उत्कर्ष पाटील (रा. निलांजली सोसायटी, कल्याणीनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विनायक उलगा मुधोळकर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले की, पोर्ट ब्लेअरमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या कोर्टाचे वॉरंट येरवडा पोलिसांकडे आले होते. धनादेश न वटल्याप्रकरणाच्या खटल्यासंदर्भात हे वॉरंट होते. पोलिसांनी घरी जाऊन त्यांना वॉरंट बजावले व गाडीतून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. आरोपीला अंदमानला पाठवायचे की येथील न्यायालयात हजर करायचे, त्यांची वैद्यकीय तपासणी, कोविड चाचणी करायची होती. त्याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्यात येत होते.
दरम्यान, आरोपीने थंडीमुळे आपला हात दुखत असल्याचे व कारमधील हिटरवर उब घेण्याचा बहाणा केला. त्याला कारमध्ये बसवून पोलीस गाडीसमोर उभे होते. त्यांनी शेजारी उभे असलेल्या सहायक फौजदार मोर यांना धक्का देऊन खाली पाडले. मुधोळकर यांच्या अंगावर खाली घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन कार घेऊन तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहे.