मुख्याधिकार्यांची बनावट सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 08:52 PM2017-12-11T20:52:08+5:302017-12-11T20:52:19+5:30
मुख्याधिकारी सचिन पवार यांची बनावट सही करत एका बंगलेधारकाला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत दाखला देणार्या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 197, 465, 468 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे बनावट लेटरहेड तयार करत त्यावर फसवणुकीच्या उद्देशाने मुख्याधिकारी सचिन पवार यांची बनावट सही करत एका बंगलेधारकाला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत दाखला देणार्या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 197, 465, 468 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरपरिषदेचे बिट अधिकारी संजय कदम यांनी फिर्याद दिली आहे.
लोढा गोल्ड क्रिस्टचा व्यवस्थापक पंकज मसुरकर (रा. नेताजीवाडी, खंडाळा) यांच्याविरोधात सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लोढा गोल्ड क्रिस्ट येथील प्रफुल्ल राणावत यांचा विला क्र. 30 ला रेनशेडची परवानगी देण्यात आली आहे का, अशी माहिती नगरसेवक सुनील इंगूळकर यांनी मागितली होती. त्यावर अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे मुख्याधिकारी यांनी इंगूळकर यांना कळविल्यानंतर या बोगस प्रकरणाचा पर्दाफाश झाला. राणावत यांना तर बांधकाम परवानगी देण्यात आली होती.
त्या परवानगी पत्राची पाहणी मुख्याधिकारी यांनी केली असता लेटरहेड व त्यावरील सही तसेच मजकुराचा फॉन्ट या सर्वच गोष्टी बनावट असल्याचे समोर आल्यानंतर वलवण गावातील सदर बांधकामाचा पंचनामा व राणावत यांचे केअरटेकर संदेश शंकर घरात यांचा जबाब नोंदविल्यानंतर लोढा येथrल व्यवस्थापक मसुरकर याने राणावत यांच्याकडून 40 हजार रुपये घेऊन सदर बनावटगिरी केली असल्याचे समोर आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.