पोलीस कोठडीचे लोखंडी गज कापून आरोपी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:14+5:302021-02-18T04:16:14+5:30
भोर : पोलीस कोठडीत असणारे आरोपी कोठडीच्या लोखंडी गजा कापून पळून जाण्याच्या घटना अनेकदा आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. मात्र, ...
भोर : पोलीस कोठडीत असणारे आरोपी कोठडीच्या लोखंडी गजा कापून पळून जाण्याच्या घटना अनेकदा आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतात. मात्र, अशी प्रत्यक्ष घटना घडली आहे ती पुण्यातील भोर तालुक्यात. आरोपीने पोलीस कोठडीचे लोखंडी गज कापून भल्या पहाटे पोलिसांच्या हातावर तुरी दिली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणामुळे भोर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, रा. मु. पो ढवळ, ता. फलटण, जि. सातारा) व प्रवीण प्रल्हाद राऊत ( वय ३२, रा. चिखली, ता. इंदापूर, जि पुणे) अशी पळून गेलेल्या आरोपींची नाावे आहेत.
या दोन्ही आरोपींवर दरोड्यासह १४ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी या दोघांना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच चंद्रकांत लोखंडेने गोळीबार केला होता तर प्रवीण राऊत हा यापूर्वी जेलमधून पळून गेला होता. दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोका लावलेला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे दोघांनी पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करून दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता व चारचाकी गाडीतून पळून गेले होते. या गुन्ह्यात शोध घेत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबारही केला होता. यात एक अधिकारी जखमी झाले होते. राजगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वरील आरोपींना ताब्यात घेतले होते. ९ फेबुवारीपासून दोन्ही आरोपींना भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याच ठिकाणी इतर गुन्ह्यातील दोन आरोपी असे चौघे जण एकाच पोलीस कोठडीत होते. मात्र चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत या दोघांनी इतर दोघांना जिवे मारण्याची धमकी देत आज पहाटे हॅक्साॅब्लेडने कोठडीचे गज कापून पळ काढला. ही घटना उघड होताच बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भोर पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली. आरोपींना पकडण्यासाठी विविध पथक नेमण्यात आले आहेत.
--
चौकट
गज कापायला हॅक्साॅब्लेड कोठडीत आले कुठून?
--
दोन्ही आरोपी हे सराईत आहेत व पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल केलेला असल्याचे पोलिसांना माहिती असतानाही त्यांच्यावर कडक पहारा का ठेवण्यात आला नाही? पोलीस कोठडीत हॅक्साॅब्लेड कोठून आले?, गज कापताना आवाज कसा आला नाही? आरोपीच्या बंदोबस्ताला राजगड पोलीस ठाण्यातील ४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते? असताना गज कापताना व ते पळून जाताना बंदोबस्तातील कर्मचारी कोठे होते? असे अनेक प्रश्न सध्या समोर येत असून याची उत्तरे पोलिसांनी अद्याप दिली नाहीत.