निंबुत गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडेला अटक, भोर परिसरातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:16 PM2024-07-01T12:16:47+5:302024-07-01T12:17:13+5:30
भोर परिसरातून काल रात्रीच्या वेळी ताब्यात घेतल्याचे समजते.....
सोमेश्वरनगर (पुणे) : निंबुत गोळीबार प्रकरणात रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे फरार असल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुख्य आरोपी गौतम काकडे यास अटक केली आहे. भोर परिसरातून काल रात्रीच्या वेळी ताब्यात घेतल्याचे समजते.
बैलगाडा चालक-मालक संघटनेतील एक प्रमुख व्यक्ती गौतम काकडे यानी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा 'सुंदर' नावाचा बैल ३७ लाख रुपयांना खरेदी केला होता. यापैकी पाच लाख रुपये इसार देऊन बैल सोमवारी घरी आणला होता. गुरुवारी सकाळी गौतम यांनी पैसे दिले नव्हते. रात्री उर्वरित रक्कम नेण्यासाठी गौतम यांनी बोलावले होते. निंबाळकर हे पत्नी अंकिता, मुलगी अंकुरण, वैभव कदम, पिंटू जाधव यांच्यासह चारचाकीत गौतम काकडे यांच्या घरी गेले. घरासमोर बराच काळ चर्चा चालली. गौतम काकडे यांनी पैसे सकाळी देतो आता स्टॅम्पवर सही करा असे म्हटले. त्यावर रणजीत निंबाळकर यांनी पैसे द्या नाहीतर इसार परत घेऊन बैल परत द्या असे म्हणणे मांडले. याचे पर्यवसन वादात झाले.
याप्रसंगी गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी पिस्तुलातून थेट रणजित यांच्यावर गोळी झाडली. उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे रणजीत यांचा मृत्यू झाला. यामुळे आधी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता त्याऐवजी आरोपींवर आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूची बातमी समजताच बैलगाडा क्षेत्रातील निंबाळकर यांचे असंख्य चाहते, त्यांच्या अकादमीचे विद्यार्थी, नातेवाईक संतप्त झाले होते.
पोलिसांनी घटनेदिवशीच गोळीबार करणारा आरोपी गौरव आणि ज्यांच्या नावे पिस्तुल आहे ते सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे याना अटक केली. दोघांना पोलिस कोठडीही मिळाली आहे. मात्र गौतम काकडे फरार झाला होता.
'फरार आरोपीस अटक करून कडक शासन करा' या मागणीसाठी हजारापेक्षा अधिक लोकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर धाव घेतली होती. तसेच रणजित यांची पत्नी अंकिता यांनीही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काकडे यांच्या निवासस्थानी जाण्याचा काही आंदोलकांनी इशारा दिला होता. यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला होता. आठ पथके गौतमच्या मागावर होती. अखेर पोलिसाना आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भोर येथून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे, पोलिस सूत्रांनी सांगितले.