दोघांचा खुन केल्याप्रकरणी आरोपीला ७ वर्ष सक्तमजुरी
By admin | Published: April 2, 2017 02:59 AM2017-04-02T02:59:36+5:302017-04-02T02:59:36+5:30
केडगांव (ता. दौंड) येथे साधुचा वेष धारण करुन मठातील सोन्याच्या चोरीसाठी दोघांचा खुन केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश आर.बी. देशपांडे
बारामती: केडगांव (ता. दौंड) येथे साधुचा वेष धारण करुन मठातील सोन्याच्या चोरीसाठी दोघांचा खुन केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश आर.बी. देशपांडे यांनी ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
अशोक देवेंद्र शिंदे उर्फ भरतनाथ (वय २५, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे.केडगाव येथे २० आॅगस्ट २०११ रोजी सदगुरु चौरंगनाथ महाराज ट्रस्टच्या नवनाथ मंदीरात हा प्रकार घडला. या बाबत संतोष गजानन जाधव (वय २८, रा. चौरंगीनाथ महाराज मठ,केडगाव ) यांनी पोलीसात फिर्याद दिली. आरोपी भरतनाथ याने मठातील सोन्याचांदीचे दागिने चोरण्यासाठी साधुचा वेष घेतला. तसेच वेश घेउन मठात प्रवेश मिळविला. मठातील महंत गोविंद रामा रासकर उर्फ अविनाथजी गुरुचौरंगीनाथजी महाराज (वय ७५, रा. वाघुंडे, ता. पारनेर, जि .अहमदनगर) ,त्यांचे शिष्य शरद मल्हारी मुळीक (वय ५०, रा गलांडवाडी, ता .दौंड) यांच्यामुळे सोनेचोरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे आरोपीने महंत आणि त्यांच्या शिष्याला मारण्याचा कट रचला. मठातील स्वयंपाक खोलीत त्याने थायमेट हे विषारी औषध दुधात मिसळले. हे दुध पिल्याने महंत व त्यांच्या शिष्याचा मृत्यु झाला. हे विषारी दुध पिल्याने चार मांजरे देखील मृत्युमुखी पडली.
आरोपी भरतनाथ याच्या हाती मात्र सोने लागले नाही. घटनेनंतर तो केडगांव येथील रेल्वे पुलाखाली लपला. पोलीस तपासात तो सापडला. त्याच्याकडे थायमेट, बँकेचे पासबुक सापडले. त्याच्यावर २२ आॅगस्ट २०११ रोजी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बी. डी. कोपनर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी आठ साक्षीदार तपासले.