Pune Crime | खोरोची वयोवृद्ध दाम्पत्य खुनी हल्ला व लूट प्रकरणातील आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 11:26 AM2022-12-17T11:26:12+5:302022-12-17T11:30:02+5:30
चुकीची माहिती अन् काळाचा घाला...
इंदापूर (पुणे) : ‘खोरोची वयोवृद्ध दाम्पत्य खुनी हल्ला व लूट प्रकरणा’चा ७२ तासांत छडा लावून तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळवले आहे. तुषार दादासाहेब चव्हाण (वय २२, रा. पाटील वस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर), रोहन उर्फ सोन्या शिवाजी जाधव (वय १९, रा. हनुमान चौक, खोरोची, ता. इंदापूर), नितीन बजरंग जाधव (वय २७, रा. खंडोबा मंदिरामागे, खोरोची, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
१३ डिसेंबर रोजी पहाटे खोरोची गावात आपल्या घरासमोर झोपलेल्या दयाराम नारायण कणिचे (वय ७०), जनाबाई दयाराम कणिचे (वय ६५) या वयोवृद्ध जोडप्याला अनोळखी इसमांनी लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून त्यांना जबर जखमी केले होते. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात जाऊन आतील घरातील चीजवस्तू चोरून नेल्या होत्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दयाराम कणिचे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. इंदापूर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली. मात्र गुन्हा करतेवेळी आरोपीने कोणताही सुगावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर होते. ते स्वीकारून पुणे स्थानिक गुन्हे शाखा इंदापूर व वालचंदनगर व या दोन्ही पोलिस ठाण्यांची चार पथके नेमून तपास सुरू करण्यात आला. गोपनीय बातमीदारामार्फत हा गुन्हा तुषार चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांनी केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर त्वरेने हालचाली करून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस कर्मचारी विकास राखुंडे करत आहेत.
चुकीची माहिती अन् काळाचा घाला
या वृद्ध जोडप्याकडे जमिनीच्या व्यवहारातील पैसे येणार असल्याची चुकीची माहिती आरोपींना मिळाली होती. तिच्या आधारे तीन महिन्यांपूर्वी त्यांना लुटण्याचा प्लॅन आरोपींनी तयार केला होता. त्यामध्ये वृद्धाचा हकनाक जीव गेला. वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.