अंत्यविधीला न आल्याने खून प्रकरणातील आरोपी गजाआड; बिर्याणी खाल्ली, चहा पिला त्यानंतर खून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:40 PM2024-04-23T12:40:00+5:302024-04-23T12:40:23+5:30

काकू शेतात आल्याचे समजताच ते निघाले शहराकडे....

Accused in murder case arrested for not attending funeral; Ate biryani, drank tea then killed | अंत्यविधीला न आल्याने खून प्रकरणातील आरोपी गजाआड; बिर्याणी खाल्ली, चहा पिला त्यानंतर खून

अंत्यविधीला न आल्याने खून प्रकरणातील आरोपी गजाआड; बिर्याणी खाल्ली, चहा पिला त्यानंतर खून

- नितीश गोवंडे

पुणे : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात जून २०२० मध्ये डबल मर्डरची हृदयद्रावक घटना घडली. या खून प्रकरणात एकाेणीस वर्षीय बहिणीचा आणि सतरा वर्षीय भावाचा (वय १७) चोरीच्या उद्देशाने अज्ञाताने गळा कापून खून केल्याची तक्रार मयत मुलांच्या आईने सातारा पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांसमोर या प्रकरणातील आरोपी शोधणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, नात्यातीलच व्यक्ती या मुलांच्या अंत्यसंस्कारावेळी गैरहजर असल्याने पोलिसांचा संशय त्यांच्यावर बळावला. पुढे तीन दिवसांतच या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले. मात्र, आजही या घटनेचा विषय निघाला की, अंगावर शहारे येतात. त्या दोन मुलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो, अशी भावना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी व्यक्त केली.

सुरेंद्र माळाळे २०२० साली छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक होते. ९ जून २०२० रोजी दोन मुलांचा खून आणि १ किलो सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने (मुलांच्या आईने) फिर्याद दिली होती. घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यावेळी अनेक मुद्द्यांवर पोलिस तपास करत होते; पण कोणताच क्लू, संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते. सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील काही मिळाले नसल्याने अज्ञात आरोपींचा तपास पोलिस करत होते.

असा बळावला संशय...

शवविच्छेदनानंतर दोन्ही मयत मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून सुरेंद्र माळाळे हे देखील उपस्थित होते. संपूर्ण गाव, नातेवाईक या घटनेमुळे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते; पण मयत मुलांचा सख्खा चुलत भाऊ हजर नव्हता. यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला.

काकू शेतात आल्याचे समजताच ते निघाले शहराकडे..

या प्रकरणातील मयत मुलांची आई ही तिच्या तीन मुलांना शिक्षणासाठी म्हणून शहरात घेऊन आली होती. जालना जिल्ह्यातील पाचणवडगाव हे त्यांचे गाव. या गावात त्यांची शेती असल्याने व नातेवाईक मंडळीच त्या शेतावर काम करण्यासाठी असल्याने ३८ वर्षीय महिला (मुलांची आई) सतत शेतावर जात होती. त्यांचा पुतण्या (या प्रकरणातील आरोपी) हा काकू शेतात कधी येते व कधी जाते, याचा अभ्यास करत होता. त्या दिवशी काकू शेतावर येताच आरोपी पुतण्याने तिला कधीपर्यंत शेतावर थांबणार आहे असे विचारले. तेव्हा तिने संध्याकाळपर्यंत थांबणार आहे, असे सांगितले. हे ऐकताच पुतण्या आणि त्याचा भाऊजी (सख्ख्या बहिणीचा नवरा) हे दुचाकीवरून संभाजीनगरकडे निघाले.

बिर्याणी खाल्ली, चहा पिला त्यानंतर खून आणि चोरी...

आरोपी चुलत भाऊ (वय २०) आणि त्याचा भाऊजी (२५) हे दोघे त्यादिवशी दुपारी घरी आले. येताना त्यांनी जालना येथून एका दुकानातून २ चाकू आणि एका मेडिकलमधून हँडग्लोव्हज खरेदी केले. घरी आल्यावर बहिणीने केलेली बिर्याणी त्यांनी खाल्ली, त्यानंतर थोड्या वेळाने चहादेखील पिला. यानंतर आधी १७ वर्षीय भावाला बाथरूममध्ये घेऊन जात त्याचा गळा चिरला. यावेळी त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून १९ वर्षीय बहीणदेखील धावत आली, यानंतर तिलादेखील पकडून त्याच बाथरूममध्ये गळा चिरून मारले. त्यानंतर घरातील वरच्या रूममध्ये जात कपाटातील १ किलो सोन्याचे दागिने घेऊन आरोपींनी पळ काढला.

---

मनमाडमार्गे गावी..

खून केल्यानंतर दुचाकीवरून आरोपींनी संबंधित भाऊजीच्या मनमाडजवळील गावाकडे पळ काढला. तेथून रात्री पाचणवडगाव येथे ते पोहोचले. यावेळी त्यांनी अंगावरील कपडे एका शेतात जाळले, ते जळलेले कपडे, बूट आणि एक चाकू एका विहिरीत, तर दुसरा चाकू दुसऱ्या विहिरीत टाकून, सोने शेतात पुरले.

---

व्हॉट्सॲप स्टेटसमुळे समजले...

काकूकडे मोठ्या प्रमाणात सोने आहे, हे काकूने व्हॉट्सॲप स्टेटसवर टाकलेल्या फोटोमुळे पुतण्याला समजले होते. त्यानंतर पुतण्याने अनेकदा घरातून सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला होता. मात्र, त्यादिवशी आपला चुलत भाऊ आणि भाऊजी या विचाराने आपल्या घरात आले असतील, याची पुसटशी कल्पना देखील त्या भावंडांना नव्हती.

---

कोट..

मीच या प्रकरणाचा तपास अधिकारी असल्याने घटनास्थळी पंचनामा करण्यापासून मी होतो. ते दृश्य बघून मीच गहिवरून गेलो होतो. पुढील ४-५ दिवस मला झोपदेखील लागत नव्हती. मात्र, आम्ही आरोपींना नुसते पकडलेच नाही तर ते गावातून निघाल्यापासून घरी पोहोचेपर्यंतचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मिळवले. यात ते चाकू घेताना, हँडग्लोव्हज घेतानादेखील आढळून आले. त्यांनी विहिरीत टाकलेले चाकू, कपडे, दुचाकीवरील रक्ताचे पुरावे यामुळे आम्ही न्यायालयात आरोपींविरोधात भक्कम चार्जशीट दाखल करू शकलो. आजही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, आरोपींना अद्यापपर्यंत न्यायालयाने जामीनदेखील दिलेला नाही. कोणत्याही गुन्ह्यात १०० शक्यतांचा विचार करून, अत्यंत बारकाईने तपास केला तर कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारे आरोपीपर्यंत पोहोचता येऊ शकते, त्या आरोपींना शिक्षा होण्यासदेखील मदत मिळते.

- सुरेंद्र माळाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे.

Web Title: Accused in murder case arrested for not attending funeral; Ate biryani, drank tea then killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.