शुभदा खून प्रकरणातील आरोपीची कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:50 IST2025-01-14T15:49:12+5:302025-01-14T15:50:13+5:30
पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे

शुभदा खून प्रकरणातील आरोपीची कारागृहात रवानगी
पुणे : विमानगरमधील एका आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय २७, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला सोमवारी (दि. १३) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, त्याच्या वतीने ॲड. सचिन कुंभार, ॲड. संजय खेडकर व ॲड. किरण धरपाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने बचावपक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते. मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शुभदा ही कंपनीच्या पार्किंगमध्ये आली होती. त्याचवेळी कनोजिया याने तिला पार्किंगमध्ये गाठले. त्याने तरुणीच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. तिला येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.