कोयत्याने वार करून दोघांना केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:46 AM2018-11-11T02:46:45+5:302018-11-11T02:47:08+5:30
रोहन त्याचा भाऊ पवन आणि रमेश यांच्यासोबत घरी जाताना गोरख पेठे यांच्या वखारीसमोरून त्यांच्या तोंडओळखीचा अतुल कचरावत याने त्यांना अडविले
पुणे : आपली परिसरात दहशत पसरविण्यासाठी दोघांवर कोयत्याने वार करून, एका सलून दुकानाच्या काचा फोडणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी रोहन वैरागे (वय २३, रा. साठेनगर, महम्मदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार साठेनगर येथील गोरख पेठे यांच्या वखारीसमोर व फैज कटिंग सलूनमध्ये ८ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता घडला़
रोहन त्याचा भाऊ पवन आणि रमेश यांच्यासोबत घरी जाताना गोरख पेठे यांच्या वखारीसमोरून त्यांच्या तोंडओळखीचा अतुल कचरावत याने त्यांना अडविले व तुम्हाला जास्त मस्ती आली का? असे म्हणत हातातील कोयत्याने रोहन याच्या मानेवर वार केला. यानंतर रोहन, पवन आणि रमेश तिघेही येथील फैज कटिंगच्या दुकानात शिरले. त्यापाठोपाठ अतुलही दुकानात शिरला. त्याने पवन व रोहनवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर अतुलने दुकानाच्या काचा फोडल्या व त्याच्या एका साथीदारासोबत दुचाकीवर बसून हवेत कोयता फिरवत पसार झाले.
खडकीत चंदनाची चोरी
पुणे : खडकीतील एलफिन्स्टन रोडवर असलेल्या बंगल्यातील चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नितीन कालेकर (वय ५१, रा़ पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. एलफिन्स्टन रोडवरील बंगल्याच्या आवारात दोन चंदनाची झाडे होती़ शुक्रवारी दुपारी साडेबारा ते रात्री आठच्या दरम्यान चोरट्यांनी आत प्रवेश करून १० हजारांच्या चंदनाच्या दोन झाडांचा बुंधा कापून नेला.