नोकरीच्या आमिषाने फसवणूक, आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:34+5:302021-07-10T04:09:34+5:30
पुणे : नागरिकांशी संपर्क साधून आकर्षक नोकरी लावण्याची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सायबर ...
पुणे : नागरिकांशी संपर्क साधून आकर्षक नोकरी लावण्याची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सायबर पोलिसांनी नवी दिल्ली येथे जाऊन कॉल सेंटवरवर धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. उच्चशिक्षित महिलेला नोकरी लावण्याच्या बहाण्याने सव्वा नऊ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबरकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचे शोधसत्र सुरू झाले आणि त्यांना यश मिळाले.
रिषभ कुमार अनिल दुबे, विपीन अशोक यादव, रिषम मनीष दुबे, पियुष कुमार सतीश यादव (रा. जे.जे कॉलनी, सेक्टर नं ७ द्वारका, रामफल चौक दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित महिलेने नोकरी मिळविण्याकरिता आॅनलाईनद्वारे विविध जॉब पोर्टलवर त्यांचा बायोडेटा अपलोड केला होता. फेब्रृवारी आणि मार्चमध्ये महिलेला आरोपींनी वेगवेगळे मोबाईल क्रमांक आणि बनावट डोमेन तयार करून त्यावरून बनावट ई-मेल आयडीचा वापर करून संपर्क साधला आणि त्यांना पुणे व मुंबई येथे मल्टि नँशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. आरोपींनी महिलेला वेगवेगळी कारणे सांगून पेमेंट लिंकद्वारे पैसे भरायला सांगून त्यांची ९ लाख २५ हजार ३८० रूपयांची फसवणूक केली. तातडीने तांत्रिक तपासाच्या साहाय्याने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन आणि वेळेत रिटर्न आॅफ प्रॉपर्टीचे आदेश न्यायालयातून पारित करून घेत फिर्यादीच्या फसवणूक झालेल्या रकमेपैकी ९ लाख १३ हजार ७०८ रूपये एवढी रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात आली आहे.