खडकीतील खुनाचे आरोपी ८ तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:04 AM2019-03-15T04:04:00+5:302019-03-15T04:04:05+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी; नात्याला आक्षेप घेऊन केला खून
पुणे : अनैतिक संबंधांच्या मस्करीवरून झालेल्या वादविवादाचे पर्यवसान खुनात झाले. त्यासाठी वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने घरी जाऊन रात्री पार्टीदरम्यान दगडाने ठेचून खून केल्याची घटना खडकी बाजार येथे घडली. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना ८ तासांत जेरबंद केले.
गोपाळ अर्जुन कांबळे (वय ३२, रा़ बंगला नं. २६, खडकी बाजार, खडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. राजेश राजू स्वामी (वय २४), सागर अशोक उंबरकर (वय २४, दोघे रा़ खडकी), धीरज गोपाळ गवळी (वय २४, रा़ खडकी बाजार), रेणुका परदेशी आणि राधा राजू स्वामी अशी त्यांची नावे आहेत़ ही घटना खडकीमधील आर्मी बेस वर्कशॉप येथील बंगला नं. २६ येथे मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली़ याप्रकरणी एका ५० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
हे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस हवालदार राजू मचे व गणेश काळे यांना मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी चिंचवड येथील बिजलीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला व त्यांना पकडले. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस हवालदार राजू मचे, गणेश काळे आणि विशाल शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नात्यावरून मस्करी केल्यामुळे झाला होता वाद
पोलिसांनी सांगितले, की या महिलेने गोपाळ कांबळे याला आपला मुलगा मानले होते. गोपाळ व ही महिला एकत्र राहत होते़ त्यांचा भाचा सागर उंबरकर याचा या नात्याला विरोध होता़ या कारणावरून सागर व त्यांच्या नातेवाइकांमध्ये वारंवार भांडणे झाली होती़ १३ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता ही महिला व गोपाळ बंगला नंबर २२ येथे रिना गाडेकर यांच्या घरी बर्फ आणण्यासाठी गेले होते़
या वेळी राधा स्वामी व रेणुका परदेशी यांनी त्यांच्या संबंधांवरून मस्करी केली होती़ त्यावर त्यांच्यात वाद झाला होता़ तेव्हा सायंकाळी रेणुका व राधा यांनी त्यांना शिवीगाळ केली होती़ ही बाब सागर याला समजल्यावर ते संगनमत करून वाढदिवस साजरा करण्याचा व दारू पिण्याचा बहाणा करून कांबळे याच्या घरी गेले़ मध्यरात्री कांबळे याचा दगडाने मारहाण करून व शस्त्राने वार करून खून केला़