‘मोक्का’तील फरार आरोपी पिस्तुलासह जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 08:25 PM2018-05-04T20:25:30+5:302018-05-04T20:25:30+5:30
नातेवाईकांना भेटण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीच्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले आहे.
पुणे : ‘मोक्का’तील फरार आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले आहे. मागील दोन वर्षांपासून फरार होता. बापू रामदास मळेकर (वय ३२, रा. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. वैकुंठ स्मशानभूमीत सापळा रचून त्याला पकडण्यात आले.
मळेकर नातेवाईकांना भेटण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीच्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरोपी ज्या स्विफ्ट मोटारीमधून आला होता, तिची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुसे असा मोटारीसह ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याला अटक करण्यात येऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व मुंबई पोलीस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर बारामती पोलीस ठाण्यात दरोडा, खंडणी, दुखापत, गर्दी-मारामारी आदी गुन्हे दाखल आहेत. खडक पोलीस ठाण्यातील एका गुन्हयात तो २०१६ पासून फरार आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त बसवराज तेली (परिमंडल १) सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी शरद वाकसे, बाबा दांडगे, संजय बनसोडे, धीरज पवार, सचिन जगदाळे, चेतन शिरोळकर, राहुल पवार, सुधीर भिलारे यांनी केली.