मुळशीतील सातव खून प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद; दोन वर्षांपासून होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:12 AM2021-07-02T11:12:38+5:302021-07-02T11:12:54+5:30
ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद येथून अटक केली आहे
पौड: सातव खून प्रकरणातील फरार आरोपी सूरज सुतार याला ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद येथून अटक केली आहे. २०१९ मध्ये दसऱ्याच्या दिवशी मुळशीतील लवळे येथे प्रतीक सातव याची पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर बाकी आरोपीना अटक करण्यात आली होती. मात्र गुन्हा घडल्यापासून यातील सुरज राजाराम सुतार (वय ३० वर्ष रा. सुतारवाडी पाषाण) हा फरार होता.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख यांनी त्याचा शोध घेण्याच्या उद्देशाने दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीण पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने माहिती काढून सुतार याला सिल्लोड औरंगाबाद येथे जाऊन ताब्यात घेतले आहे. व पुढील कारवाईसाठी पौड पोलीस स्टेशन यांना सुपूर्द केले आहे. सुरज सुतार हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.
सुरज सुतार याला दोन वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश
मुळशीतील लवळे येथे राऊतवाडी ते भरे गावच्या दरम्यान सातव , कळमकरवस्ती आहे. या रस्त्याने प्रतिक व त्याचे अन्य दोन मिञ नवीन गाडी घेऊन सातवमळा (सावतामाळी मंदीर) परिसरात राहत्या घरी जात होते. येथील एका पोल्ट्री फार्मलगतच्या रस्त्यावर मारेकरी आरोपींनी गाडीला ट्रॅक्टर आडवा घालून प्रतिकला बाहेर ओढले आणि त्याच्यावर कोयता तसेच तलवारींनी सपासप वार केले. त्यात प्रतिकचा जागीच मृत्यू झाला होता. १९ ऑक्टोबर २०१९ ला हि घटना घडली होती. त्यानंतर आरोपीना तातडीने अटक करण्यात आली. पण त्यांच्यापैकी एक सुरज सुतार तेव्हापासून फरार होता. त्याला दोन वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.