माजी सैनिकाला भूमी अभिलेखकडून मनस्ताप, माजी सैनिक भाऊसाहेब भोंगळे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:45 AM2018-04-05T02:45:00+5:302018-04-05T02:45:00+5:30
दौंड भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी बी. एम. ताकभाते व बांधकऱ्याने संगनमताने आपल्या जमिनीची शासकीय गाव नकाशानुसार मोजणी केली नाही; तसेच या कर्मचा-याने शासकीय पदाचा दुरुपयोग करीत मानसिक त्रास दिल्याचा आरोप, मळद (ता. दौंड) येथील माजी सैनिक भाऊसाहेब नारायण भोंगळे यांनी केला आहे.
बारामती - दौंड भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी बी. एम. ताकभाते व बांधकऱ्याने संगनमताने आपल्या जमिनीची शासकीय गाव नकाशानुसार मोजणी केली नाही; तसेच या कर्मचा-याने शासकीय पदाचा दुरुपयोग करीत मानसिक त्रास दिल्याचा आरोप, मळद (ता. दौंड) येथील माजी सैनिक भाऊसाहेब नारायण भोंगळे यांनी केला आहे.
भाऊसाहेब भोंगळे यांच्या पत्नी सुनीता भाऊसाहेब भोंगळे यांची मळद गावाच्या हद्दीत गट क्र. ५२५ मध्ये ५८ गुंठे क्षेत्र आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये बांधकरी यांनी भोंगळे यांच्या मालकीच्या शेतात चुन्याने मार्किंग करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माजी सैनिक भाऊसाहेब भोंगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस ठाण्याने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये बांधक-यांनी भाऊसाहेब भोंगळे यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी रावणगाव पोलीस ठाण्यात भोंगळे यांनी तक्रार दाखल केली.
भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करून घेण्याचा सल्ला यावेळी पोलिसांनी भोंगळे व बाधक-यांना दिला. या गटाच्या मोजणीचे पैसे सुनीता भोंगळे यांनी दौंड भूमिअभिलेख कार्यालयात भरले. कर्मचारी बी. एम. ताकभाते यांनी या गटाची मोजणी केली. मोजणी करीत असताना गावनकाशानुसार केली गेली नसल्याचा आरोप, भोंगळे यांनी केला आहे. तसेच सुनीता भोंगळे यांनी मोजणीचे ९ हजार रुपये भरले असताना देखील ताकभाते यांनी बांधक-याकडून ५ हजार ५०० रुपये घेतले असाही आरोप भोंगळे यांनी केला आहे.
याबाबत भोंगळे यांनी मे २०१७ मध्ये जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, भूमिअभिलेख अधीक्षक व दौंड येथील भूमिअभिलेखा उपअधीक्षक यांना पत्रव्यवहार करून ताकभाते यांच्याबद्दल तक्रार केली. तसेच गावनकाशानुसार पत्नीच्या नावे असणाºया जमिनीची पुन्हा मोजणी करून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, हा प्रकार गंभीर असून याची अद्याप दखल घेतली नसल्याचे भोंगळे यांनी सांगितले.
माझ्या कुटुंबाला व मला त्रास देणे सुरूच आहे. स्वमालकीची जमीन असतानादेखील त्यावर बांधकरी अतिक्रमण करीत आहेत. शासन दरबारी न्याय मागावा तर कोणी दखल घेत नाही. भूमिअभिलेखाचे कर्मचारी बी. एम. ताकभाते चुकीच्या पद्धतीने जमिनीची मोजणी करतात. महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांना त्रास देणाºया व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास टाळाटाळ करणाºया शासकीय कर्मचारी व अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अध्यादेश सप्टेंबर १९९७ साली काढला आहे. देशासाठी सेवा बजावून् सुद्धा आमची अशी अवहेलना होत असेल तर सामान्य जनतेचे काय?
- भाऊसाहेब भोंगळे