तांदूळ फसवणूक करणारे आरोपी पाच महिने उलटूनही मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:05+5:302021-06-16T04:15:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या तांदळाच्या ३३० कट्ट्यांची सुमारे ८ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. ...

Accused of rice fraud acquitted after five months | तांदूळ फसवणूक करणारे आरोपी पाच महिने उलटूनही मोकाट

तांदूळ फसवणूक करणारे आरोपी पाच महिने उलटूनही मोकाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड शिवापूर : शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या तांदळाच्या ३३० कट्ट्यांची सुमारे ८ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पाच महिने उलटूनही आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना भेट देत या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.

प्रकरणी तपास समाधानकारक नाही. गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी आरोपी सापडला नसून, राजगड पोलिसांचा तपास समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर या शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना अर्ज करून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.

शिवगंगा खोऱ्यातील अनेक गावांत इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट तांदळाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असते. या भागातील वेगवेगळ्या गावांतील आठ शेतकऱ्यांकडून नवनाथ गिरी याने तांदळाचे सुमारे ३५० कट्टे दुसऱ्याच्या नावे खरेदी करून फसवणूक केली. त्या तांदळाची किंमत सुमारे आठ लाख रुपये होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच महिन्यांपूर्वी राजगड पोलिसात याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु पाच महिन्यांत या फसवणूक केलेल्या आरोपीला राजगड पोलिसांना पकडता आलेले नाही. तांदूळ पिकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर शेतकरी अवलंबून असतात. मात्र ही फसवणूक झाल्याने सध्या या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांच्या तपासात काहीच प्रगती नसल्याने अखेर या शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाच अर्ज केला आहे. याप्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.

"गेल्या पाच महिन्यांत अजून आरोपीला पकडण्यात आलेले नाही. सध्या तर आमचे कोणी ऐकूनही घेत नाहीत. आरोपीला पकडून काय होणार आहे. आमच्यामागे एवढे एकच काम आहे का? तुम्ही तांदूळ देताना तुम्हाला समजले नाही का? अशी उडवाउडवीची उत्तरे आम्हाला तपास अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत," अशी प्रतिक्रिया या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

चौकट

तपास अधिकाऱ्याशी बोलून योग्य ती माहिती घेतेली जाईल, तपासकामात नेमकी काय अडचण आहे हे पाहून जर तपास अधिकारी बदलण्याची गरज असेल तर तो बदलण्यात येईल.

संदीप घोरपडे

पोलीस निरीक्षक राजगड पोलीस स्टेशन नसरापूर

Web Title: Accused of rice fraud acquitted after five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.