१ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात आरोपींना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:52+5:302021-03-08T04:12:52+5:30
पुणे : आरोपींच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी तसेच या गुन्ह्यात अजून कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे का? याचा तपास करण्यासाठी ...
पुणे : आरोपींच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी तसेच या गुन्ह्यात अजून कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी मान्य करीत न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व पोलीस कर्मचारी महेश दौंडकर यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांना १ लाख रुपये घेताना रंगेहात पकडले होते. ही कारवाई शनिवारी (दि.६) दुपारी करण्यात आली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.. रविवारी (दि.७) सर्व आरोपींना विशेष न्यायाधीश .एस.आर.नावंदर यांच्यासमोर समोर हजर करण्यात आले. या गुन्ह्यातील निष्पन्न साक्षीदारांचे जबाब नोंदविणे, गुन्हयाचा सखोल तपास करणे, गुन्ह्यात तक्रारदाराच्या मामावर दाखल असलेल्या गुन्हयाच्या छायांकित प्रती, या गुन्हयाचे सबळ पुरावे हस्तगत करणे बाकी आहे..
या गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने तपास करण्यास वेळ मिळाला नाही. आरोपींच्या कार्यालयातून हजेरीपट व इतर माहिती पुरावे घेणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. सरकार तर्फे ॲड. राजेश कावेडीया यांनी तर आरोपी तर्फे ॲड. प्रताप परदेशी यांनी बाजू मांडली, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.