साकोरी प्रकरणातील आरोपींना कोठडी
By admin | Published: September 4, 2016 04:05 AM2016-09-04T04:05:03+5:302016-09-04T04:05:03+5:30
साकोरी (ता. जुन्नर) येथील शेतमजूर दाम्पत्याचा खून व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या सहा आरोपींना शुक्रवारी जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना
आळेफाटा : साकोरी (ता. जुन्नर) येथील शेतमजूर दाम्पत्याचा खून व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या सहा आरोपींना शुक्रवारी जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
ही माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली. साकुरी शिवारातील पानसरेमळा येथे गुरुवार दि. २५ आॅगस्टच्या मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने शंकर भीमाजी पानसरे व संगीता शंकर पानसरे दाम्पत्याचा या सहा गुन्हेगारांनी कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून करून ते फरार झाले होते. ही घटना शनिवार दि. २७ आॅगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.
स्थानिक गुन्हे शाखेने पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून ऋषी ऊर्फ ऋषण अशोक काळे, अनिल ऊर्फ तिऱ्या ढोग्या काळे, मथ्था ऊर्फ नामदेव यमराज भोसले, नागेश ऊर्फ सचिन अशोक काळे, आकाश ऊर्फ डोळा कळसिंग भोसले आणि गोविंद ऊर्फ नीलेश सुरेश भोसले या आरोपींना जेरबंद केले. या गुन्हेगारांनी शंकर पानसरे यांचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केल्यानंतर त्यांची पत्नी संगीता यांच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचे तसेच ठाणे जिल्ह्यातील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही दरोडा टाकून तीन जणांचा खून केल्याचे एलसीबीच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.