‘त्या’ आरोपींना जामीन देऊ नये

By admin | Published: April 7, 2015 05:32 AM2015-04-07T05:32:13+5:302015-04-07T05:32:13+5:30

येथील शेतकरी अशोक जाधव यांच्या खून प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने जामिनावर सुटका करू नये, आरोपीचे परमिट रूम व स्वस्त धान्य दुकानाचे

The accused should not be granted bail | ‘त्या’ आरोपींना जामीन देऊ नये

‘त्या’ आरोपींना जामीन देऊ नये

Next

जेजुरी : येथील शेतकरी अशोक जाधव यांच्या खून प्रकरणातील आरोपींची न्यायालयाने जामिनावर सुटका करू नये, आरोपीचे परमिट रूम व स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द करावेत, असा ठराव साकुर्डे ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत बहुमताने मंजूर केला आहे. त्या ठरावाच्या प्रती जेजुरी पोलीस ठाणे, पुरंदर तहसील कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, दारूबंदी व उत्पादनशुल्क विभागाकडे देण्यात येणार आहेत.
साकुर्डे येथील शेतकरी अशोक बाजीराव जाधव यांचा ७ फेब्रुवारी रोजी खून करण्यात आला होता. यातील आरोपी मारुती गेणबा सस्ते, अतुल मारुती सस्ते, सुलतान यासीन सय्यद, धनंजय नाना खोमणे, भानुदास नाना खोमणे, कोंडिबा जगन्नाथ चव्हाण यांना जेजुरी पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर आरोपी साकुर्डे येथीलच रहिवासी असल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे.
आरोपी सध्या येरवडा जेलमध्ये असून, त्यांना जामीन मिळाल्यास ते गावात पुन्हा दहशत करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आरोपी मारुती सस्ते याच्याकडे गावचे शासकीय स्वस्त धान्य दुकानही आहे. साकुर्डे फाटा येथे त्याच्या कुटुंबीयांच्या नावाने परमिट रूम व बिअरबारही आहेत. आरोपींच्या समर्थकाकडून आजही गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. जामिनावर सुटल्यानंतर आरोपीकडून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका आहे. यामुळे प्रसाद जाधव याने, आरोपींना न्यायालयाने जामीन देऊ नये, तसेच परमिट रूम आणि स्वस्त धन्य दुकानाचे परवाने रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने या संदर्भात आज सकाळी साकुर्डे येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते. (वार्ताहर)

Web Title: The accused should not be granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.