४९ लाखांची लूट प्रकरणातील फरार आरोपी सहा वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:21 PM2020-12-22T17:21:38+5:302020-12-22T17:30:05+5:30
२०१४ मध्ये पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लुटण्यात आली होती
पुणे : पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या फरार आरोपी सहा वषार्नंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी सापळा रचून टिळक रस्त्यावर त्याला पकडले.
गणेश दत्तोबा नेवसे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. २०१४ मध्ये पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लुटण्यात आली होती. त्याच्यासह इतर आरोपींविरूद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश मिळाले. मात्र, गुन्ह्यात सहभागी झालेला आरोपी नेवसे पसार होता. तो कात्रज, धायरी, पर्वती भागात राहत होता. नेवसे याचा पोलिसांकडून माग काढण्यात येत होता. मात्र, तो वेगवेगळ्या भागात राहत असल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले होते. टिळक रस्त्यावरील एका गल्लीत नेवसे थांबल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि सागर सुतकर यांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील लोहार, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले,शिवाजी क्षीरसागर, विष्णू सुतार, राहुल ओलेकर यांनी ही कारवाई केली.
-----------------------