महिला पोलिसाला मारहाण करणारा आरोपी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:30 PM2019-04-04T23:30:43+5:302019-04-04T23:30:56+5:30
सापळा रचून ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई : सहा महिन्यांपासून आरोपी होता फरारी
सांगवी : बारामती एमआयडीसी परिसरात निर्भया पथकातील महिला पोलिसासह हवालदारास मारहाण केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी विजय बाळासो गोफणे अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
तीन ते चार गुन्ह्यांतील आरोपी असलेला गोफणे गेल्या सहा महिन्यांपासून फरारी होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : गोफणे हा वंजारवाडी (ता. बारामती) येथील राहणारा आहे. तो गावच्या जवळील रानमळा हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती बारामती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळच्या दरम्यान निर्भया पथकातील महिला पोलिसांचे विद्याप्रतिष्ठान परिसरात पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी रस्ता अडवून मित्रांसमवेत दुचाकीवर थांबलेल्या विजय गोफणेला पोलिसांनी, इथे का थांबला आहे, असे म्हणून ओळखपत्र व परवाना मागितला. या वेळी गोफणे याने महिला पोलिसालाच उलट बोलून शिवीगाळ करत, मारहाण केली. त्याला रोखण्यास आलेल्या हवालदारालाही मारहाण करून तो पळून गेला. गोफणे गेली सहा महिन्यापासून फरार होता. ही कामगिरी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे यांनी केली.
४महिला पोलिसांना मारहाण झाल्याने सामाजिक, राजकीय क्षेत्र, समाजातून संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषत: महिला संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला होता. विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे, पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण करणे, बेकायदेशीरपणे शस्त्रसाठा जवळ बाळगणे असे गोफणे विरोधात बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी गोफणे यास न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायलयाने गोफणे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.