आरोपींना शिक्षा होईपर्यंत शेवटचा श्वास घेणार नाही
By admin | Published: July 16, 2016 12:59 AM2016-07-16T00:59:32+5:302016-07-16T00:59:32+5:30
‘माझ्या नातवाकडून काही चुकले असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली असती, तर नक्कीच आम्ही त्याला समजावले असते;
इंदापूर : ‘माझ्या नातवाकडून काही चुकले असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली असती, तर नक्कीच आम्ही त्याला समजावले असते; मात्र ज्या पद्धतीने रश्मीकांतचा निर्घृण खून केला. तत्कालीन दोन सहायक पोलीस निरीक्षकांनी तपास करताना हलगर्जीपणा दाखविला. आता या खून प्रकरणात आरोपींना व पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत शेवटचा श्वास घेणार नाही,’ अशा शब्दांत बावडा येथील रमाकांत तोरणे यांनी भावना व्यक्त केल्या.
रश्मीकांत रजनीकांत तोरणे (वय १९, रा. बावडा) याचा १५ मार्च २०१५ रोजी अपहरण करून खून करण्यात आला. ‘माझा नातू बेपत्ता झालेला नसून त्याचे अपहरण करण्यात आले आहे’ असे सांगून काही संशयित आरोपींची नावे पोलिसांना दिली. मात्र, सुरुवातीपासूनच पोलिसांनी या तरुणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केले, हलगर्जीपणा दाखविला. रश्मीकांतचा तपास लागत नव्हता. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन सोडून दिले. चार महिन्यांनी तोरणे कुटुंबीयांनी रास्तारोको आंदोलन केले.
तेव्हा तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी गुन्हा दाखल केला. दि. २७ जुलै रोजी मुख्य आरोपी भारत सोनवणे वगळता इतरांना अटक केली.
रश्मीकांतचे अपहरण झाले आहे. त्याचा घातपात होण्याची शक्यता आहे, असे सांगूनदेखील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी तोरणे कुटुंबीयांच्या तक्रारीप्रमाणे फिर्याद घेतलीच नाही. त्यानंतर त्यांच्या जागी आलेले सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी आरोपींचा केवळ जबाब घेऊन सोडले. (वार्ताहर)