एक्सचेंज एजंटच्या डोळयावर पेपर स्प्रे मारून 12 हजार अमेरिकन डॉलरची चोरी करणारा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 08:05 PM2020-01-03T20:05:02+5:302020-01-03T20:14:09+5:30
डॉलर मोजण्याच्या बहाण्याने ते ताब्यात घेऊन फॉरेन एक्सेंजच्या एजंटच्या डोळयावर पेपर स्प्रे मारायचा....
पुणे : अमेरिकन डॉलर पाहिजे असे सांगून फॉरेन एक्सचेंज कर्मचाऱ्याकडून जबरदस्तीने डॉलरची चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट 2 कडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 12 हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. पुण्याबरोबरच हैद्राबाद येथे देखील आरोपीने डॉलरच्या नावाखाली फसवणूक केल्याचे दिसून आले. यानंतर युनिट 2 ने त्याला हैद्राबाद येथून ताब्यात घेतले.
राहूल किरण गाटीया (वय 31, रा.नेपीयन सी रोड, शांतीनगर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला सापळा लावून अटक करण्यात आली. नोव्हेंबर 2019 मध्ये कोरेगाव पार्क व येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉलरच्या नावाने फसवणूकीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्हयाचा तपास करीत असताना तशाच प्रकारचे गुन्हे त्याने हैद्राबाद येथे केल्याची माहिती युनिट 2 चे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप यांना मिळाली. त्यांनी ती युनिट मधील इतर अधिकारी व कर्मचारी यांना देऊन पुढील तपासाच्या सुचना दिल्या. आरोपीच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीवरुन तो एकच असल्याचा संशय पोलिसांना आला. आरोपी गुन्हा करताना प्रथम बनावट नावाने सर्व्हिस अपार्टमेंट बुक करत होता. नंतर फॉरेन एक्सेंजमध्ये पाच ते सात हजार अमेरिकन डॉलरची मागणी करुन त्यांना आपल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये बोलावत असे. यावेळी तो डॉलर मोजण्याच्या बहाण्याने ते ताब्यात घेऊन फॉरेन एक्सचेंज एजंटच्या डोळयावर पेपर स्प्रे मारायचा. व त्याला धक्का देऊन डॉलर घेऊन रुमचा दरवाजा बंद करुन पळुन जात असे. आरोपीची गुन्हे करण्याची कार्यप्रणाली पाहता तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करेल याची शक्यता गृहीत धरुन पुणे व हैद्राबाद येथील फॉरेन च्या अधिका-यांना सुचना देण्यात आल्या होत्या.
आरोपीने पुन्हा हैद्राबादमध्ये पुन्हा फोनवरुन एका फॉरेन एक्सचेंजमधून 7 हजार डॉलरची मागणी केली. तसेच संबंधित व्यक्तीला सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये डिलीव्हरी देण्यास सांगितले. यावेळी हैद्राबाद पोलिसांनी आरोपी राहुल गाटीया याला सापळा रचून पकडले. त्यानंतर आरोपीस कोरेगाव पार्क येथील गुन्हयात वर्ग करुन ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, प्रतापसिंह शेळके, यशवंत आंब्रे, संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अतुल गायकवाड, चेतन गोरे, स्वप्नील कांबळे यांनी पार पाडली.
..........