आचार्य अत्रेंप्रमाणे व्यक्तिमत्त्व होणे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:48 PM2018-08-17T23:48:57+5:302018-08-18T00:13:47+5:30
आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले.
सासवड - आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले.
येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अत्रे यांच्या १२० व्या जन्मदिननिमित्त २१ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
अत्रे यांच्या विचाराचा जागर त्याच्या जन्मगावी सासवडला साहित्य संमेलनाच्या रूपाने २१ वर्ष सुरू आहे. सासवडकर कौतुकाला पात्र आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची छोटी प्रतिकृती म्हणजे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन आहे, असे संमेलनाध्यक्षा अश्विनी धोंगडे म्हणाल्या. पुणे मनपाच्या माजी महापौर वैशाली बनकर, राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे या वेळी उपस्थित होते. साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषद सासवडचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के उपस्थित होते. प्रा. स्वप्नाली जगताप यांनी आभार मानले.