जैन धर्माच्या प्रसारासाठी आचार्य विद्यासागर यांचे बहुमोल योगदान
By Admin | Published: July 2, 2017 01:57 AM2017-07-02T01:57:06+5:302017-07-02T01:57:06+5:30
जैन धर्माचा प्रचार व प्रसारामध्ये आचार्य विद्यासागरजी महाराजांचे बहुमोल योगदान आहे. विसाव्या शतकात आचार्य शांतीसागरजी महाराज व
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : जैन धर्माचा प्रचार व प्रसारामध्ये आचार्य विद्यासागरजी महाराजांचे बहुमोल योगदान आहे. विसाव्या शतकात आचार्य शांतीसागरजी महाराज व एकविसाव्या शतकात आचार्य विद्यासागरजी महाराजांनी जैन धर्माची परंपरा अखंडपणे पुढे नेण्याचे काम समर्थपणे केले आहे, असे प्रतिपादन प. पू. १०८ पुलकसागरजी महाराज यांनी केले.
आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराजांच्या मुनी दीक्षेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बारामतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने विद्यासागर महाराजांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या प्रसंगी श्री महावीर भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प. पू. पुलकसागरजी महाराजांनी विद्यासागर महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
विद्यासागरजी महाराजांचे जैन धर्मियांमधील एक सजीव तीर्थ अशा शब्दात त्यांनी गौरव केला. आपल्या आचरणातून जैन धर्म म्हणजे नेमका काय, हे त्यांनी सिद्ध केले.
विसाव्या शतकात आचार्य शांतीसागरजी महाराजांनी तर एकविसाव्या शतकात विद्यासागरजी महाराजांनी जैन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी देशभर भ्रमंती केली. मुनी परंपरा अधिक समर्थपणे पुढे सुरू ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे पुलकसागरजी महाराजांनी नमूद केले.
शुभांगी कोठारी यांनी मंगलाचरण करून कार्यक्रम सुरू केला. स्मिता दोशी यांनी विनयांजली अर्पण केली. जयकुमार वडूजकर व सुकुमार कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष वालचंद संघवी, सचिव अजित वडूजकर, खजिनदार भारत खटावकर, जवाहर वाघोलीकर, किशोर सराफ, संजय संघवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.