प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पायलकुमारीची यशाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:40 PM2022-06-18T13:40:31+5:302022-06-18T13:45:02+5:30
जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर पायलकुमारीने मिळवले ९२ टक्के
कल्याणराव आवताडे
धायरी: वडील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात तर आई घरकाम करते. राहायला भाड्याने घेतलेली दोन रूमची खोली, लहान एक बहिण व भाऊ, घरची बिकट परिस्थित, मात्र यावर मात करत धायरी येथील पायलकुमारी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. पायलकुमारीने ९२ टक्के गुण मिळवून नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
घराचा रहाटगाडा हाकण्यासाठी पायलकुमारीचे वडील प्रमोदकुमार यांनी हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करली आहे. मूळचे बिहारचे असणारे कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून धायरी येथे राहावयास आहे. घरची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पायलकुमारीने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. घरच्या या हालाखीच्या परिस्थितीमध्येही तिने आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ न देता शाळेतील शिक्षकांच्या मदतीने अभ्यास केला.
तिच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. मात्र तिला भविष्यात शास्त्रज्ञ बनायचं आहे. खरं तर तिला शिक्षणाची आस आहे, गुणवत्तेची कास आहे आणि सर्वोत्तमाचा ध्यास आहे,’ मात्र अशी भावना असलेले अनेक विद्यार्थी समाजात आहेत. अशा गुणवंतांचे शिक्षण केवळ आर्थिक समस्येमुळे अडू नये, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते....
परिस्थिती कितीही बिकट असली, तरीही काही माणसं जिद्द सोडत नाही. नियती अग्निपरीक्षा घेत असते, मात्र त्यातूनही काही जण अगदी ताऊन सुलाखून निघतात. संकटांना थेट भिडणारी आणि आभाळ कोसळलं तरी त्यावर पाय रोऊन उभं राहणारी माणसं इतरांसाठी आदर्श ठरतात. परीक्षा ही बळ देते फक्त एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी असली पाहिजे. मग जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते.हेच पुन्हा एकदा पायलकुमारी प्रमोदकुमार हिच्या यशावरून समोर येतंय. तिने अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेले यश हे खरच आदर्शवत असल्याचे नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता सतीश चव्हाण यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.