‘एसीपी’ दीपक हुंबरेचा रिपोर्ट ‘डीजी’ ऑफिसला पाठविणार - पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 09:29 AM2020-05-27T09:29:21+5:302020-05-27T09:55:04+5:30
पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत असलेले व सध्या सक्तीच्या रजेवर असलेले सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध ४० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध सातारा येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली असून तसा रिपोर्ट सातारा पोलीसांकडून आल्यावर तो पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. तेथून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.
पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत असलेले व सध्या सक्तीच्या रजेवर असलेले सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध ४० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी डॉ. के. व्यंकटेशम यांनी माहिती दिली. ते सध्या रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.
हुंबरे हे सध्या पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत होते. त्यांना गेल्या ३ महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. सक्तीच्या रजेवर असताना देखील गणवेश घालून त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारले आहेत. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणाने भुईज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने काही दिवसांपूर्वी गोळीबार केला होता. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात अटक न होण्यासाठी हुंबरे यांनी तरुणाकडून ४० हजार रुपये खंडणी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविषयी पुणे शहरात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांची बदली कार्यकारी पदावरुन विशेष शाखेत केली होती. मात्र, तेथेही ते लोकांचा घोळका जमवून दरबार भरवत असल्याचे आढळून आले होते. त्याच्याबाबत तक्रारी येऊ लागल्याने कोरोना विषाणुच्या काळात पोलीस अधिकार्यांची अधिक गरज असताना पोलीस आयुक्तांनी त्यांना शिक्षा म्हणून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. सक्तीच्या रजेवर असतानाही त्यांचे उद्योग थांबले नसल्याचे या प्रकरणावरुन आढळून आले आहे.
आणखी बातम्या...
Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!
ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा
CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का