दौंड तालुक्याला टंचाईचे ग्रहण
By admin | Published: October 2, 2015 01:03 AM2015-10-02T01:03:43+5:302015-10-02T01:03:43+5:30
पावसाने मारलेली दडी, तसेच बंद पडलेल्या पाणी योजना यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे
पावसाने मारलेली दडी, तसेच बंद पडलेल्या पाणी योजना यामुळे दौंड तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही योजना बंद आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
राहू : येथील माटोबा नळपाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे या भागातील रहिवाशांना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सहा वर्षांपूर्वी या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले. परंतु अजूनही ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळू शकले नाही. या योजनेवर जवळपास ६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
काम अपूर्ण असताना ही योजना कशी सुरू झाली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या योजनेंतर्गत काही भागात आठवड्यातून जेमतेम दोन ते तीन वेळा पाणी मिळते. मात्र, काही ठिकाणी तेवढेही पाणी नागरिकांच्या नशिबी नाही. ही योजना तारक की मारक, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी चक्क पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पाणी दूषित मिळत असल्याने नागरिकांनाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा भुर्दंड ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. पाणी मिळत नसतानाही ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल केली जात आहे.
माटोबा नळपाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. आणि हे समितीचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे मान्य करीत नाहीत. ग्रामसभेतदेखील या योजनेविषयी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर या योजनेत घोटाळा झाला असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.
योजनेच्या ठेकेदाराला वेळोवेळी ग्रामसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना देखील केल्या. मात्र संबंधित ठेकेदार ग्रामसभेला उपस्थित राहात नाही.
(वार्ताहर)
नानगावची २0 वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा योजना बंद
केडगाव : नानगाव (ता. दौंड) येथील २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ही योजना बंद आहे.
नानगाव हे भीमा नदी काठावर वसलेले आहे. या गावाला क्षारयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने समस्येला सामोरे जावे लागत होते. २० वर्षांपूर्वी पाणी योजना करण्यात आली. मात्र, या योजनेचे काम निकृष्ट झाल्याने नागरिकांना आजही क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ नानासाहेब रणदिवे यांनी उपोषणदेखील केले होते. परंतु, तात्पुरते आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले.
ग्रामस्थांना शुद्ध पाणी त्वरित मिळण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी सरपंच विश्वास भोसले यांनी केली. तत्कालीन आमदार रमेश थोरात, तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून, तसेच पुणे महानगरपालिकेने ग्रामस्थांसाठी १० लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण योजना उभारली आहे. त्यानुसार अल्पदरात या योजनेंतर्गत ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.