Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज

By नम्रता फडणीस | Published: September 3, 2024 04:15 PM2024-09-03T16:15:14+5:302024-09-03T16:16:27+5:30

एफआयआरमध्ये नाव असले तरी आपल्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे

acquit us of fraud manoj Jarange Patil application in court | Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज

Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज

पुणे : मराठा आंदोलनाते नेते मनोज जरांगे पाटील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात मंगळवारी सुनावणीसाठी हजर झाले. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नाटकासंबंधी करण्यात आलेल्या करारपत्रावर आपल्या सह्या नाहीत. फसवणूक करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता. एफआयआरमध्ये नाव असले तरी आपल्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे असा अर्ज मनोज जरांगे-पाटील यांनी न्यायालयात केला.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. अशा प्रकारच्या गुन्ह्यात तडजोड होवू शकते. त्यामुळे आरोपी आणि फिर्यादी यांनी याचा विचार करावा. तडतोडीबाबत एकमत होत असेल तर हे प्रकरण मध्यस्थी न्यायालयाकडे पाठवले जाईल. आर्थिक तडजोडीद्वारे गुन्हा मिटणार असेल तर त्या तडजोडीत तीनही आरोपीची सामूहिक जबाबदारी असेल, असे स्पष्ट करत याबाबत म्हणणे (से) दाखल करण्याची सूचना न्यायालयाने सरकारी वकिलांना दिली. सरकार पक्षाने म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने हे प्रकरण २४ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात, मंगळवारी मनोज जरांगे-पाटील न्यायालयात हजर झाले होते. या प्रकरणात सरकारी वकील नीलिमा-इथापे यांना मदत करण्यासाठी मूळ फिर्यादी यांच्यावतीने युक्तिवाद करण्यास परवानगी मिळावी यासाठी ॲड. सुनील कदम यांनी अर्ज केला आहे. फिर्यादी यांच्या पत्नीच्या वतीने हा अर्ज करण्यात आला आहे. जरांगे-पाटील यांच्यावतीने ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. संतोष खामकर आणि ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली.

Web Title: acquit us of fraud manoj Jarange Patil application in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.