Pune | खासगी शाळेतील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
By नम्रता फडणीस | Published: April 3, 2023 03:41 PM2023-04-03T15:41:30+5:302023-04-03T15:45:40+5:30
बचाव पक्षातर्फे मुख्य आरोपीला साक्षीदार म्हणून तपासण्यात आले...
पुणे : वानवडी परिसतील एका खासगी शाळेतील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए पत्रावळे यांनी हा आदेश दिला.
पीडित मुलीने दि.16 एप्रिल 2014 रोजी वानवडी पोलिस ठाण्यात आॅक्टोबर 2012 च्या दरम्यान स्कूल बस अटेंडंटने चालकाच्या मदतीने बलात्कार केल्याची आणि संबंधित शाळेने त्याविषयी कुठलीही दखल न घेतल्याच्या आशयाची फिर्याद नोंदविली होती. या प्रकरणात स्कूल बस अटेंडंट व चालकांना अटक करण्यात आली होती तसेच सिटी इंटरनँशनल शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि संचालक यांनाही आरोपी करण्यात आले होते. सर्व आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे मुख्य आरोपीला साक्षीदार म्हणून तपासण्यात आले.
या प्रकरणात मुख्य आरोपीतर्फे अँड विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली. या केसमध्ये अँड दुशिंग यांच्यासह अँड स्वानंद गोविंदवार, अँड स्वप्निल क्षीरसागर यांनी काम पाहिले. फिर्याद नोंदविण्यात केलेला विलंब, पीडितेचा अविश्वसनीय पुरावा, पीडितेच्या पालकांचा घटना दाखल करण्यापासून फिर्याद दाखल करण्यापर्यंतची अस्वाभाविक वर्तणूक, अपुरा वैद्यकीय पुरावा, गुन्हयाच्या तपास कामातील त्रुटी व आकस तसेच सरकार पक्षाच्या पुराव्यातील विसंगती या मुद्यावर अँड दुशिंग यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राहय धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्त्तता केली.