अभिनयाचा ‘रियाज’ आवश्यक : गिरीश कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:39+5:302020-12-29T04:09:39+5:30
पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली ...
पुणे : हल्ली चार- पाच पोरं एकत्र येतात, काहीतरी वाजवतात. माध्यमांनी त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची व्यवस्था केलेली असतेच. पण या पद्धतीने खरंच संगीतकार होता येतं का? हा प्रश्न पडायला हवा. अभिनयाला देखील ही गोष्ट लागू होते. सध्याची तरूण मुले अभिनयाचे कचकड्याचे शिक्षण घेत आहेत. ‘अभिनय’ शिकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यासाठी रियाज अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला अभिनेते, दिग्दशर्क गिरीश कुलकर्णी यांनी तरूण रंगकर्मींना दिला.
एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ नाट्यगृहामध्ये आयोजित ‘थिएटर आॅन’ महोत्सवात रविवारी (दि.27) कुलकर्णी यांच्या गप्पांचा कार्यक्रम रंगला. अभिनेता क्षितीज दाते याने त्यांच्याशी संवाद साधला.
आज उठसूठ अभिनेता बनण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला जातो. मात्र मुंबईत कलाकार बाजूला राहातो आणि कलाकाराची जगण्याचीच एकप्रकारे लढाई सुरू होते. मग पडेल ते काम करावे लागते. अभिनेता म्हणून कामे मिळाली नाही तरी चालतील, तुमच्यात ती आंतरिक ऊर्जा आणि क्षमता असेल तर कामे आपोआप मिळत राहातील. पण त्यासाठी रियाज पक्का आहेत? का? कलाकार म्हणून स्वत:कडून अपेक्षा काय आहेत? भूमिकेचा अभ्यास केला जातो का? व्यक्तिचित्रे मनात रेखाटून त्यात समरस होण्यासाठी प्रयत्न केला जातोय का? असे प्रश्न पडायला हवेत, असे कुलकर्णी म्हणाले.
दरम्यान, महोत्सवामध्ये रविवारी (दि.27) सकाळी लहान मुलांसाठी कार्यशाळा तर सायंकाळी रित्विका श्रोत्री लिखित आणि कौमुदी वलोकर दिग्दर्शित ‘तहकूब’ नाटकाचे सादरीकरण, क्षितीज दाते याचा मँजिक शो आदी कार्यक्रम रंगले. विराजस कुलकर्णी लिखित आणि सूरज पारसनीस दिग्दर्शित ‘मिकी’ या मराठी नाट्याने महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवाला स्वीच बाईक, कार साथी, बेल्ज केक, वैष्णवी भेळ यांचे प्रायोजकत्व लाभले. ‘लोकमत’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.
-------------------------------------------
...हे नाकारणं कलाकाराला कठीण झालं आहे.
कलाकार हा एक सामान्य माणूस आहे. पण त्यांना डोक्यावर बसवले जाते. मग त्यांनी भूमिका घेणं अधिक दुर्धर होते. त्यांनी बोललं की माध्यमं मागे धावणार. मग ते राजकीयदृष्ट्या अचूक राहाण्याचा प्रयत्न करणार. असे पासरीभर नट आसपास आहेत. त्यातून व्यवहारचतुर राहाता येते. प्रस्थापित होता येते अशी व्यवधाने आहेत. हे नाकारणं कठीण झालं आहे, असे कलाकारांच्या वर्तुणुकीमागचे भीषण वास्तव गिरीश कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.
---------------------------------------------------------------------