कामचुकार २१ वाहतूक पोलिसांवर कारवाई
By admin | Published: March 5, 2016 12:51 AM2016-03-05T00:51:41+5:302016-03-05T00:51:41+5:30
वाहतूक नियमनात कामचुकारपणा करणाऱ्या २१ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे : वाहतूक नियमनात कामचुकारपणा करणाऱ्या २१ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. वेळोवेळी सूचना करूनही कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
मागील दोन महिन्यांत नेमणुकीचे ठिकाण सोडून जाणे, नियंत्रण कक्षातील फोनला उत्तर न देणे, कामाच्या वेळी फोन बंद करून ठेवणे, महत्त्वाच्या चौकात वाहतूककोंडी झाली असताना हजर न राहणे अशा विविध कारणांवरून २१ पोलिसांवर ही कारवाई केली आहे. याबाबत या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी कामचुकारपणा केल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड म्हणाले, ‘‘काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकारी किंवा नियंत्रण कक्षाला सांगून नेमणुकीचे ठिकाण सोडण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पण, याकडे दुर्लक्ष करून काही कर्मचारी चौक सोडून निघून जातात. भेट दिल्यानंतर काही वेळेला चौकात कर्मचारी नसल्याचे आढळून येते. नियंत्रण कक्ष किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रतिसाद मिळत नाही. त्यांचा मोबाईल बंद असल्याने काही वेळा अडचणी उद्भवतात. अशा २१ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.’’