आक्षेपार्ह २५ टिकटॉक व्हिडिओ, १५ फेसबुक पेजवर पोलिसांची कारवाई : संदीप पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 01:50 PM2019-12-30T13:50:46+5:302019-12-30T13:51:48+5:30
कोरेगाव भीमा विजयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
पुणे : दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये सोशल मीडियावर खास लक्ष ठेवले आहे. यात आतापर्यंत आक्षेपार्ह २५ टिकटॉक व्हिडिओ व १५ फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याशिवाय काही व्हॉट्सअॅप गु्रपच्या अॅडमिनला देखील नोटिसा दिल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी येथे दिली.
जिल्ह्यात येत्या १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी पाटील यांनी वरील माहिती दिली. यंदा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह, प्रक्षोभक लिखाण करणाºयांवर पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय कोरेगाव भीमा परिसरामध्ये कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भांतील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी आयोजित केलेल्या सभामध्ये होणाºया भाषणांवर देखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये एनआरसी कायद्याविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.