रेल्वेकडून ५७७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:47 AM2017-07-27T06:47:49+5:302017-07-27T06:47:52+5:30
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील सहा महिन्यांत ५७७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ६ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील सहा महिन्यांत ५७७ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ६ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी प्रशासनाकडून परवाने दिले जातात. मात्र, अनेकवेळा असे परवाने नसलेले अनधिकृत विक्रेते सर्रासपणे खाद्यपदार्थांची विक्री करतात. रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दोन दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानकावरील एका अनधिकृत विक्रेत्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
रेल्वे प्रशासनाकडून विक्रेत्यांबाबत मवाळ भूमिका घेतली जात असल्याचा आरोप शहा यांनी या वेळी केला होता. त्यावर प्रशासनाकडून बुधवारी मागील सहा महिन्यांत विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणारे खाद्यपदार्थ, पाण्याच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असून त्याचे कडक परीक्षण केले जात आहे.
त्यानुसार मागील सहा महिन्यांत ५७७ अनधिकृत विक्रेत्यांना पकडून ६ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.