नववर्षाचे स्वागत करताना ८७३ तळीरामांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 10:06 PM2019-01-01T22:06:19+5:302019-01-01T22:06:29+5:30
नववर्ष साजरे करताना मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८७३ तळीरामांवर पुणे शहर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे.
पुणे : नववर्ष साजरे करताना मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८७३ तळीरामांवर पुणे शहर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे. त्यात ६९३ दुचाकीस्वार असून, १८० तीन व चारचाकी वाहनचालकांचा समावेश आहे. वर्षभरात दारू पिऊन वाहन चालविणा-या १४ हजार ९७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविणा-या तळीरामांचे लायसन्स जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर येत्या ३ जानेवारीपर्यंत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून समन्स पाठविले जाईल. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचे लायसन्स रद्द करण्याविषयी प्रादेशिक परिवहन विभागाला शिफारस केली जाईल. यादरम्यान, ते वाहन चालविताना आढळल्यास ते विना परवाना वाहन चालवित असल्याचे समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
काही वर्षापूर्वी ३१ डिसेंबरला नववर्ष साजरा करताना वेगाने वाहने चालविल्याने प्राणघातक अपघात होत असत. वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी जनजागृती आणि ठेवण्यात येत असलेला बंदोबस्त यामुळे या वर्षी ३१ डिसेंबरला एकही प्राणांतिक अपघात झालेला नाही. २०१७ मध्ये एकूण २४७ प्राणघातक अपघात होऊन त्यामध्ये २६१ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये एकूण २४० प्राणघातक अपघात होऊन त्यात २५२ जणांचा मृत्यू झाला असून, गतवर्षीपेक्षा प्राणांतिक अपघात ७ ते कमी झाले असून त्यात मृतांची संख्या ९ ने कमी झाली आहे.
नव्या वर्षात हे अपघाताचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निश्चय पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केला आहे. त्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करून व इतर वाहतूक नियमांचे पालन करून सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षेबाबत आपली जबाबदारी समजून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. ३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियमभंग करणा-या वाहनचालकांवर केलेल्या परिणामकारक कारवाईमुळे व लावण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे ३१ डिसेंबर सारख्या महत्वाच्या दिवशी शहरामध्ये वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यात आली होती. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना केलेल्या सहकार्याबद्दल पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.
कोरेगाव पार्क परिसरात सर्वाधिक तळीराम
अनेक क्लब, पब, पंचतारांकित हॉटेल कोरेगाव पार्क परिसरात आढळून येतात. या ठिकाणी शुक्रवारी, शनिवारी मध्यरात्री अनेकदा या हॉटेल, बार, पबमध्ये आलेल्या ग्राहकांमुळे वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. त्यात अनेक दारू पिऊन वाहन चालविणारे आढळून येतात. कोरेगाव पार्क वाहतूक विभागाने वर्षभरात सर्वाधिक १२६१ तळीरामांवर कारवाई केली आहे. त्या खालोखाल हडपसर ९८१, दत्तवाडी ९३७, येरवडा ९१० अशी कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी पाठवा, बक्षीस मिळवा
शहरातील वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे पाठवून बक्षीस जिंकण्याची संधी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. पुणे पोलिसांनी सतर्क पुणेकर नावाचे अॅप नागरिकांना प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिला आहे. ते अॅप जास्तीतजास्त नागरिकांनी डाऊनलोड करुन शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांच्या तक्रारी या अॅपच्या माध्यमातून कराव्यात़ जे नागरिक जास्तीत जास्त वाहतूक नियमभंगाबाबत तक्रारी या अॅपद्वारे पाठवतील, तयांना योग्य ते बक्षीस देण्यात येणार आहे, असे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे.