वाढीव बिले देणाऱ्या २० खासगी रुग्णालयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:43+5:302021-01-15T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेने वारंवार नोटीस पाठवूनही, कोरोनाबाधित रुग्णांची वाढीव बिले कमी करण्यास नकार देणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेने वारंवार नोटीस पाठवूनही, कोरोनाबाधित रुग्णांची वाढीव बिले कमी करण्यास नकार देणाऱ्या शहरातील खाजगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. यात शहरातील खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. यात शहराच्या विविध भागांत शाखा असलेल्या मोठ्या रुग्णालयांचा समावेश आहे.
काेराेनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांकडून वाढीव दराने बिल आकारणी केली जात असल्याने राज्य सरकारने उपचाराच्या खर्चाबाबतची नियमावली जाहीर केली हाेती. या नियमावलीनुसारच बिलाची आकारणी करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिकेकडे वाढीव बिलाच्या संदर्भात १६८ तक्रारी आल्या हाेत्या. त्याची पडताळणी केली जात आहे.
आत्तापर्यंत अकरा रुग्णांना वाढीव बिलाचे पैसे परत देण्यात आले आहेत. संबंधित रुग्णांना एकूण १२ लाख ६२ हजार ८८३ रुपये खाजगी रुग्णालयाकडून देण्यात आल्याची माहिती सहायक आराेग्यप्रमुख डाॅ. मनीषा नाईक यांनी दिली. तसेच १ कोटीहून अधिकची रक्कम पालिकेच्या सूचनेनुसार काही रुग्णालयाने कमी केल्याचेही त्यांनी सांगितले.
------
चौकट
कोरोनाबाधित रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले शहरातील काही खाजगी रुग्णालयांनी आतापर्यंत आकारली आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्याने, महापालिकेने त्यांना वारंवार नोटीस पाठवून बिल कमी करण्याची सूचना केली. मात्र न्यायालयाच्या इतर काही आदेशांचे दाखले देत त्यांनी आतापर्यंत यास नकार दिला होता. परंतु सदर आदेश कोविड आजार व्यतिरिक्तच्या आजारांचा संदर्भात आहे. यामुळे आता पुन्हा पालिकेच्या रडारवर नोटिसा झुगारणारी खाजगी रुग्णालये आली आहेत. अशांवर सक्तीची कारवाई करण्याबाबत कार्यवाही सुरु असून, ती कशा रीतीने करायची याबाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे.
----