Mumbai - Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर नियम मोडणाऱ्या २३ हजार वाहनांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:38 AM2023-03-22T11:38:45+5:302023-03-22T11:40:17+5:30
१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान २३ हजार ६७५ वाहनांवर या पथकांद्वारे कारवाई....
पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसह जुन्या महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी १२ पथकांमार्फत गेल्या ३ महिन्यांपासून २४ तास तपासणी केली जात आहे. या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी १ डिसेंबर २०२२ पासून २४ तास तपासणी करण्याच्या सूचना महामार्ग पोलिस, आयआरबी आणि मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील या प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिल्या. गेल्या तीन महिन्यांत यामुळे अपघातांचे प्रमाण ३० टक्क्यांनी तर जखमी होणाऱ्यांमध्ये ४७ टक्क्यांची घट दिसून आली. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान २३ हजार ६७५ वाहनांवर या पथकांद्वारे कारवाई करण्यात आली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील दररोज होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अभिनेते, राजकीय नेते यासह हजारो सर्वसामान्यांचा बळी यामध्ये गेला. यावेळी वाहतूक नियमांचे पालन आणि बेशिस्त वाहन चालवण्याच्या पद्धतीमुळे बहुतांश अपघात झाल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने, अशा बेशिस्त वाहन चालकांवर आळा घालण्यासाठी ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. १२ पथके आणि ३० अधिकारी २४ तास (दिवसा ६ आणि रात्री ६) अशा वाहन चालकांवर कारवाई करीत आहेत.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात २०२२ आणि २०२३ मध्ये झालेले अपघात-
प्राणांतिक अपघात - २०२२ मध्ये २१ आणि २०२३ मध्ये १४
गंभीर अपघात - २०२२ मध्ये १६ आणि २०२३ मध्ये १३
किरकोळ अपघात - २०२२ मध्ये ०७ आणि २०२३ मध्ये ०३
एकूण - २०२२ मध्ये ४१ आणि २०२३ मध्ये ३०
प्राणांतिक अपघातातील मृत्यू - २०२२ मध्ये ३१ आणि २०२३ मध्ये १४
गंभीर अपघातातील जखमी - २०२२ मध्ये ४१ आणि २०२३ मध्ये १२
किरकोळ अपघातातील जखमी - २०२२ मध्ये ०९ आणि २०२३ मध्ये ०७
एकूण - २०२२ मध्ये ८१ आणि २०२३ मध्ये ४३
महामार्गावरील नियमांचे उल्लंघन असे..
डिसेंबर २०२२ - वेगमर्यादेचे उल्लंघन - १,३५५, विना सीटबेल्ट - १,६४०, राँग साईड पार्किंग - ७३८
जानेवारी २०२३ - वेगमर्यादेचे उल्लंघन - १,७५९, विना सीटबेल्ट - १,५४१, राँग साईड पार्किंग - ६०१
फेब्रुवारी २०२३ - वेगमर्यादेचे उल्लंघन - १,०१०, विना सीटबेल्ट - १,००५, राँग साईड पार्किंग - ३३९